esakal |  १८ महिन्यात २८ किलोमीटरचे काम अन् कामाचे कंत्राट २० टक्के कमी दराने​
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Akola Akot road construction is slow

राष्ट्रीय महामार्ग बांधकामातील घोळ थांबता थांबेना. गेले तीन वर्षांपासून खोदून ठेवलेल्या अकोला-अकोट रस्त्याचे ग्रहण सुटण्याची चिन्हे नाहीत. आधी कामात दिरंगाई, नंतर न्यायालयीन लढा आणि आता नव्या कंत्राटदाराची पाच वर्षांपूर्वीच्या दराने २० टक्के कमी दराने मंजूर झालेली निविदा या रस्त्याच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण करणारी आहे. महिनाभरात नवीन कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

 १८ महिन्यात २८ किलोमीटरचे काम अन् कामाचे कंत्राट २० टक्के कमी दराने​

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला :  राष्ट्रीय महामार्ग बांधकामातील घोळ थांबता थांबेना. गेले तीन वर्षांपासून खोदून ठेवलेल्या अकोला-अकोट रस्त्याचे ग्रहण सुटण्याची चिन्हे नाहीत. आधी कामात दिरंगाई, नंतर न्यायालयीन लढा आणि आता नव्या कंत्राटदाराची पाच वर्षांपूर्वीच्या दराने २० टक्के कमी दराने मंजूर झालेली निविदा या रस्त्याच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण करणारी आहे. महिनाभरात नवीन कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.


अकोला ते अकोटपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे ४० किलोमीटरच्या टप्प्यात सिमेंट काँक्रिटिकरण करण्यात येत आहे. या कामासाठी केंद्र सरकारने २५५ कोटी रुपये मंजूर केले होते. हे काम पुणे येथील एम.बी. पाटील कंपनीला देण्यात आले होते. मात्र कंपनीने दिलेल्या मुदतीत काम केले नाही. त्यानंतर मुदतवाढ देवूनही कंपनीला काम न करता आल्याने नोव्हेंबर २०१९ मध्ये पुन्हा मुदतवाढ दिली. मार्च २०२० पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश असताना कंपनीकडून कोणतेही काम करण्यात आले नाही. परिणामी कंपनीचा करार रद्द करण्यात आला.

त्याला संबंधिताने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर पाटील कंपनीचा करार रद्द झाला असून, पुण्यातीलच प्रथमेश कंपनीला नव्याने कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीने सादर केलेली निविदा २०१५-१६ च्या सीएसआर रेट नुसार होती. त्यातही कंपनीने २० टक्के कमी दराने निविदा सादर केली असल्याने तांत्रिकदृष्ट्या ती मंजूर झाली आहे. मात्र मुळातच पाच वर्षांपूर्वीचे दर व आता वाढलेले सिमेंट, लोखंड, मजुरी, इंधनाचे दर बघता कमी दराने काम करणारी कंपनी कोणत्या दर्जाचे काम करील याबाबत स्वतः राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंताच साशंक आहेत.


१८ महिन्यात २८ किलोमीटरचे काम
पुण्यातील प्रथमेश कंपनीला देण्यात आलेल्या कंत्राटानुसार येत्या महिन्याभरात कार्यारंभ आदेश कंपनीला दिले जाणार आहे. कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून १८ महिन्यात कंपनीला या मार्गावरील उर्वरित २८ किलोमीटरचे काम पुलांसह पूर्ण करावे लागणार आहे. त्यासाठी आता अभियंत्यांना हातात काठी घेवूनच कंत्राटदाराच्या मागे उभे राहून काम गुणवत्तापूर्ण व वेळेत पुर्ण करून घ्यावे लागणार आहे.


पूर्वीच्या पाटील कंपनीचा कंत्राट रद्द केल्यानंतर कंपनी न्यायालयात गेली होती. कंत्राट रद्द केल्यानंतर नियमानुसार राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेनुसार मूळ अंदाजपत्राकाच्या २० टक्के कमी दराने निविदा सादर करणाऱ्या पुण्यातील प्रथमेश कंट्रक्शन कंपनीला न्यायालयाच्या निर्णयानंतर कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
- रावसाहेब झाल्टे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, अकोला

(संपादन - विवेक मेतकर)