एक निनावी तक्रार: शिक्षिकेचे प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांवर आरोप, शहरात चर्चेला उधाण

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 12 December 2020

तेल्हारा नगर परिषदेच्या शाळेतील एका शिक्षिकेने मागील आठवड्यात तेल्हारा नगर परिषदेचे प्रभारी शिक्षणाधिकारी हिरालाल अग्रवाल यांची लेखी तक्रार केली आहे.

तेल्हारा (जि.अकोला) : तेल्हारा नगर परिषदेच्या शाळेतील एका शिक्षिकेने मागील आठवड्यात तेल्हारा नगर परिषदेचे प्रभारी शिक्षणाधिकारी हिरालाल अग्रवाल यांची लेखी तक्रार केली आहे.

तक्रारीत तक्रारकर्त्या शिक्षिकेचे नाव नाही. या तक्रारीमध्ये प्रभारी शिक्षणाधिकारी हिरालाल अग्रवाल यांच्या नावाचा उल्लेख करीत त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आलेले आहेत.

ही तक्रार महिला नगराध्यक्षा वगळता शिक्षण सभापती व इतर महिला नगरसेविकांना देण्यात आली आहे. या तक्रारीच्या प्रती वरिष्ठांना पाठविण्यात आल्याचा त्यात उल्लेख आहे.

शिक्षिकां संदर्भात उद्धटपने व अश्लील बोलणे, एखाद्या शिक्षिकेला उशीर झाला असता दुसऱ्या शिक्षकांजवळ अस्लील कमेंट करणे, शाळेला सुट्टी झाल्यावर त्यांना थांबून ठेवणे, धमकी देताना न. प. मधील प्रशासन माझं काहीही बिघडवू शकत नाही, कारण त्यांच्या काळ्या कामांचा लेखाजोखा माझ्याकडे आहे.

यासह काही न. प. पुरुष सदस्यांची नावेही तक्रारीमध्ये आहे. प्रभारी शिक्षण अधिकारी अग्रवाल यांच्या मानसिक त्रासा मुळेच एक शिक्षक काही दिवसांपूर्वी नागपूर उच्च न्यायालयातून परतत असतानाच अपघातात मरण पावला, तर दुसऱ्या एका शिक्षिकेला जबरदस्तीने मुख्याध्यापकांचा पदभार दिला म्हणून ती हृदय विकाराच्या झटक्याने मरण पावली अशीही नोंद तक्रारींमध्ये आहे.

तक्रारीमध्ये असलेल्या आरोपांची यादी खूप मोठी आहे. जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी अशीच तक्रार देण्यात आली होती. त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे त्या तक्रारीप्रमाणेच यावेळच्या तक्रारीलाही कचऱ्याच्या डब्यात टाकून त्यांच्याकडील विविध पदभार कायम ठेवून पुन्हा त्यांना पाठीशी घातले जाते का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सदर शिक्षिकेने केलेली निवानी तक्रार पोस्टद्यारे प्राप्त झाली आहे. तरी त्या शिक्षकीने न घाबरता समोर येऊन लेखी तक्रार करावी. मी त्यांच्या सोबत सख्या बहिणी सारखी पाठीशी आहे.
- आरती गजानन गायकवाड, शिक्षण सभापती, तेल्हारा न.प

माझ्यावर केलेली तक्रार ही पूर्णतः निराधार आहे. त्यामुळे कुणीतरी मला मानसिक त्रास देण्याचे हेतून, सुडबुद्धीने माझ्यावर खोटे आरोप केलेले आहे. नगर परिषदेच्या अधिकारी यांनी चौकशी करावी. त्यामध्ये जनते समोर सत्य बाहेर येईल.
-हिरालाल अग्रवाल, प्रभारी शिक्षण अधिकारी, तेल्हारा न.प.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Allegations against teacher-in-charge, officials in charge of Telhara