
पातूर तालुक्यात विवरा येथील शेतकरी हरिष व श्रीकांत जनार्दन धोत्रे या भावंडांनी जैविक शेतीतून शाश्वत उत्पन्नाचा राजमार्ग शोधला आहे. एका वर्षात दोन एकरामध्ये त्यांनी तब्बल दोन लाख ६० हजार रुपयांचे सीताफळ उत्पन्न घेतले असून, त्यातून दोन लाखांचा निव्वल नफा मिळविण्याची किमया करून दाखविली आहे.
अकोला : पातूर तालुक्यात विवरा येथील शेतकरी हरिष व श्रीकांत जनार्दन धोत्रे या भावंडांनी जैविक शेतीतून शाश्वत उत्पन्नाचा राजमार्ग शोधला आहे. एका वर्षात दोन एकरामध्ये त्यांनी तब्बल दोन लाख ६० हजार रुपयांचे सीताफळ उत्पन्न घेतले असून, त्यातून दोन लाखांचा निव्वल नफा मिळविण्याची किमया करून दाखविली आहे.
जनार्दन धोत्रे व त्यांची दोन मुले १९९८ पासून विवरा येथे आठ एकरावर जैविक शेती करीत आहेत. त्यामध्ये सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर इत्यादी पारंपरिक पिकांसोबत लिंबू व इतर पिकांचे उत्पादन ते जैविक शेती पद्धतीतून घेत आले आहेत.
२००६ पासून ते दोन एकरात सातत्याने सिताफळ उत्पादन घेत आहेत. २०१४ पासून मात्र ते डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे कुवरसिंह मोहने यांच्या मार्गदर्शनात सिताफळ व इतर पीक उत्पादने घेत आहेत. त्यातून त्यांना आतापर्यंत लागवड खर्च वजा जाता दहा लाख ४७ हजार २५० रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. शिवाय दरवर्षी त्यांचे उत्पन्न वाढत असून, सिताफळ बागेत आंतरपीक म्हणून इतर पारंपरिक पिकाचेही उत्पादन सातत्याने घेत असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सर्व उत्पादन स्वतः विकले
विशेष म्हणजे व्यापारी साखळीला फाटा देत, उत्पादीत सर्व सिताफळ हरिष व श्रीकांत या भावंडांनी स्वतः किरकोळ पद्धतीतून ग्राहकांना विक्री केले. त्यामुळे संपूर्ण नफा त्यांना मिळाला व ग्राहकांनाही कमी दरात जैविक पद्धतीतून पिकविलेले सीताफळ मिळाले.
सीताफळ उत्पादनातून सातवर्षातील निव्वळ नफा
हरिष व श्रीकांत जनार्दन धोत्रे या भावंडांनी गेल्या सात वर्षात जैविक सिताफळ शेतीतून दहा लाख ४७ हजार २५० रुपये निव्वळ नफा मिळविला आहे. त्यामध्ये २०१४ साली ९५ हजार, २०१५ साली ९३ हजार, २०१६ साली एक लाख ४० हजार, २०१७ साली ७० हजार, २०१८ साली एक लाख ७५ हजार, २०१९ साली दोन लाख ७३ हजार तर, २०२० साली दोन लाख एक हजार २५० रुपये नफा मिळविला आहे.
एका वर्षात उत्पादनासाठी केलेला खर्च
बकरी लेंडी खत (एक ट्रॉली)-३००० रुपये, जिवामृत तयार करणे (गुळ, बेसण)-१८०० रुपये, जिवामृत ड्रिंचिंग (चार वेळा)-२००० रुपये, दशपर्ण अर्क फवारणी (चार वेळा)-१६०० रुपये, सिताफळाचे खालचे डिर काढणे-१००० रुपये, कुंपण खर्च (काट्या+मजुरी)-२२०० रुपये, सिताफळ रोटर (दोन वेळा)-२२०० रुपये, रखवाली-९००० रुपये, तोडणी मजुरी-१९,२०० रुपये, वाहतूक-१४००० रुपये, मनपा चिट्टी (४७X१५)-६७५ रुपये, असा एका वर्षात दोन एकरातील सिताफळ उत्पादनासाठी एकूण ५९ हजार २७५ रुपये खर्च आला. त्यातून मिळालेल्या सिताफळाची विक्री करून, हाती दोन लाख ६० हजार ५२५ उत्पन्न आले. आलेले उत्पन्न वजा खर्च जाता धोत्रे भावंडांना २०२० साली दोन लाख १२५० रुपये निव्वळ नफा मिळाला.
(संपादन - विवेक मेतकर)