पंचवीस हजार कष्टकरी, व्यावसायिकांच्या रोजगार बुडाला

सुगत खाडे  
Tuesday, 13 October 2020

गत पाच महिन्यांपासून कोरोना संकटामुळे विवाह व मंगल कार्य तसेच राजकीय, धार्मिक प्रसंगांना साकार करणारा कामकरी व व्यावसायिक वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. विवाह व मंगल कार्य बंद असल्यामुळे महानगरातील या कार्यात गुंतलेला निरनिराळा अंदाजे पंचवीस हजार कष्टकरी व व्यावसायिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अकोला :  गत पाच महिन्यांपासून कोरोना संकटामुळे विवाह व मंगल कार्य तसेच राजकीय, धार्मिक प्रसंगांना साकार करणारा कामकरी व व्यावसायिक वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. विवाह व मंगल कार्य बंद असल्यामुळे महानगरातील या कार्यात गुंतलेला निरनिराळा अंदाजे पंचवीस हजार कष्टकरी व व्यावसायिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शासन अनलॉक अंतर्गत हळू-हळू सर्वच बाबींवरील निर्बंध शिथिल करत आहे. परंतु अत्यंत महत्वाच्या मंगल कार्यांना परवानगी नाकारत आहे.

सदर बाबीचा निषेध करण्यासाठी विवाह संघर्ष सेवा समितीच्या वतीने सोमवार (ता. १२) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसीय धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

गत पाच महिन्यांपासून महानगरातील लॉन, भवन, मंगल कार्यालये कोरोना संकटामुळे बंद करण्यात आली आहेत. लग्नविधीला केवळ पन्नास लोकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मंगल कार्यांसाठी सेवा पुरविणाऱ्या क्षेत्रावर आर्थिक संकट निर्माण झाले असून कर्जबाजारी झालेल्या या व्यवसायातील काही व्यावसायिकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत.

महानगरात दोन हजार ते साठ हजार चौरस फुट क्षेत्रफळाचे अनेक लहान, मोठे लॉन, मंगल कार्यालय, भवन उपलब्ध आहेत.

मंगलकार्य प्रसंगी वरील श्रेणीतील वर्ग हा त्या ठिकाणी काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवीत असतो. परंतु कोरोनाच्या स्थितीमुळे अद्याप या व्यवसायावरील टाळेबंदी न हटवण्यात आल्यामुळे अनेक व्यावसायिकांच्या पोटाला चिमटा बसत असून त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ही बाब लक्षात घेवून शासनाने या व्यवसायाला दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून करण्यात आली. सदर धरणे आंदोलनास आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांच्याह शहरातील इतर मान्यवरांनी भेटी दिल्या.

विविध संघटनांचा सहभाग
अकोला टेंट असो, मंगल कार्यालय कार्यालय ॲंड लॉन असो, पूरोहित संघ, फ्लावर डेको असो, इवेंट मॅनेजमेंट असो, फ्लावर डेकोरेशन असो, साऊंड ॲंड लाईट असो, फोटोग्राफर असो, वेडिंग प्रिटिंग असो, बॅंड असो, घोडी बग्गी असो, ब्राह्मण संघठनसह लग्न व मंगल कार्यालयाला सहाय्य करणाऱ्या सर्व वर्गाच्या संस्था व संघटना सहभागी होत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Allow the work of professionals in marriage institutions!