शिक्षक मतदार संघात पंचरंगी लढतीची शक्यता , सुट्ट्या व कोरोनामुळे प्रचारात अडचणी

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 21 November 2020

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक  येत्या १ डिसेंबर रोजी होऊ घातली असून, यासाठी वाशीम जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजारावर शिक्षक त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

वाशीम:  अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक  येत्या १ डिसेंबर रोजी होऊ घातली असून, यासाठी वाशीम जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजारावर शिक्षक त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

शिक्षकांच्या विविध संघटनांचे एकूण २७ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु, खरी लढत मात्र पंचरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने व दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शिक्षकांशी संपर्क साधण्यासाठी उमेदवारांना प्रचंड मोठी कसरत करावी लागत आहे.

नागपूर विभागाचे विभाजन झाल्याने सन १९८० मध्ये अमरावती शिक्षक मतदार संघाची निर्मिती झाली. तेंव्हा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या दोनच शिक्षक संघटना परस्पर विरोधी लढत होत्या.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ही सर्वात जुनी म्हणजे १९५६ मध्ये स्थापन झालेली शिक्षकांची संघटना आहे. तिचा कोणत्याही राजकीय पक्षासी संबंध नाही. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मात्र भारतीय जनता पक्षासी संलग्नित असलेली संघटना मानली जाते. अमरावती शिक्षक मतदार संघाची निर्मिती १९८० मध्ये झाली असली तरी, पहिली निवडणूक मात्र, १९८४ मध्ये झाली.

त्यामध्ये विमाशि संघाचे बाबासाहेब सोमवंशी हे निवडून आले होते. त्यानंतर १९९० मध्ये म.रा. शिक्षक परिषदेचे वसंतराव मालधुरे विजयी झाले होते. १९९६ मध्ये पुन्हा परिषदेचेच दिवाकर पांडे निवडून आले होते. त्यानंतर २००२ मध्ये विमाशि संघाच्या वसंतराव खोटरे यांनी निवडणूक जिंकली होती मात्र, संघटनेत उमेदवारीवरून वाद झाला.

त्यामुळे २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार खोटरे यांनी संघटनेशी बंडखोरी करून त्यांची उमेदवारी जाहीर केली. यामध्ये त्यांनी संघटनेचे अधिकृत उमेदवार  श्रावण बरडे यांचेवर मात करून दुसऱ्यांदा ते आमदार झाले. त्यामुळे विमाशि संघ ही संघटना खिळखिळी झाली.

त्याचाच फायदा शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांना मिळाला. २०१४ च्या निवडणुकीत ते निवडून आले. पूर्वी शिक्षकांच्या या दोनच संघटना होत्या. मात्र २०१४ च्या निवडणुकीपासून अनेक संघटना निर्माण झाल्या. यावेळेस मात्र या संघटनासह काही राजकीय संघटनांनीही त्यांचे उमेदवार पुरस्कृत केले आहेत.

शिक्षकांच्या प्रश्नासाठी पोटतिडकीने झगडणाऱ्या या संघटना होत्या. मात्र, आता या क्षेत्रात राजकारणाने शिरकाव केला आहे. त्यामुळे आर्थिक बाबतीत सधन असलेले उमेदवार या क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी प्रचंड पैसा खर्च करत आहेत. मतदारांना प्रलोभने देण्यासाठी महागड्या भेटवस्तू सुद्धा देण्यात येत आहेत.

या उमेदवारांना निवडणूक चिन्ह नसल्याने मतदारांना उमेदवार निवडीसाठी पसंती क्रमांक द्यावा लागतो. या विभागात एकूण ५४ तालुके असून, त्यासाठी सुमारे ३६ हजार शिक्षक मतदान करणार आहेत. वाशीम जिल्ह्यात साडेतीन हजार मतदार असून सर्वात कमी मतदार असलेला हा जिल्हा आहे.

एवढ्या मोठ्या मतदार संघात संपर्क साधण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागत आहे. या मतदार संघात २७ उमेदवार उभे असले तरी, लढत मात्र पंचरंगी होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये विमाशि संघ, मराशिप, विभागीय शिक्षक महासंघ, अमरावती विभागीय शिक्षक संघ, शिक्षक आघाडी, विज्युक्टा या संघटनेच्या उमेदवारांमध्येच खरी टक्कर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: In Amravati Shikshak constituency, five candidates are likely to contest