किडनी आजाराने १६ तासात दुसरा बळी

पंजाबराव ठाकरे
Thursday, 5 November 2020

शहरातील ३४ वर्षीय युवकाचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाल्यानंतर १६ तासाने ४ नोव्हेंबरला ५५ वर्षीय इसमाचा किडनी आजारानेच मृत्यू झाल्याची घटना घडली.

संग्रामपूर (जि.अकोला) :  शहरातील ३४ वर्षीय युवकाचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाल्यानंतर १६ तासाने ४ नोव्हेंबरला ५५ वर्षीय इसमाचा किडनी आजारानेच मृत्यू झाल्याची घटना घडली.

संग्रामपूर येथील प्रमोद उर्फ सचिन पंजाबराव सोनोने या युवकाचा ३ नोव्हेंबरला किडनी आजाराने मृत्यू झाला होता. त्यांना गेल्या ६ वर्षांपासून या आजाराने पछाडले होते.

चार वर्षांपासून त्यांचे डायलिसीस व उपचार सुरू होते. शेगाव येथील माऊली हाॕस्पिटलमध्ये डायलिसीस उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. त्यांचे पश्चात, पत्नी, २ मुली व एक ४ वर्षाचा लहान व विवाहित १ बहिण आहे.

ते भूमीहीन असून, घरातील कर्ता पुरुष होते. संध्याकाळी त्यांचेवर संग्रामपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. सचिन सोनोनेच्या मुत्यूनंतर ४ नोव्हेंबरला पांडुरंग साटोटे यांचा किडनी आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली.त्याचे पश्चात २ मुली, २ मुले असा आप्त परिवार आहे. या दोघांच्या मृत्यूने त्यांचे कुटुंब उघड्यावर आल्याने शासनाने या दोन्ही कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

पश्चिम वऱ्हाडातील अकोला, अमरावती, वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यात अनेक गावे खारपानपट्ट्यात येतात. जमीनितील पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षार आढळतात. या परिसरात किडणीच्या आजाराचे अनेक प्रकरणे आत्तापर्यंत समोर आली आहेत. 

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Another victim of kidney disease in 16 hours