esakal | जिल्ह्यातील अकरा कोविड केअर सेंटर बंद!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Eleven Kovid Care Centers closed in the district!

जिल्ह्यात गत पाच, सहा महिन्यांपासून थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख ऑक्टोबर महिन्यात घसरला असल्याने ११ कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील अकरा कोविड केअर सेंटर बंद!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः जिल्ह्यात गत पाच, सहा महिन्यांपासून थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख ऑक्टोबर महिन्यात घसरला असल्याने ११ कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहेत.

त्यामुळे कोविड केअर सेंटरची संख्या आता १५ वरुन ११ झाली आहे. ग्रामीण व तालुका स्तरावरील सर्वच कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले असून अकोला महानगरातील चार केंद्र सुरूच ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये सुद्धा मोजकेच रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे.


कोविड-१९ रोगाने जिल्ह्यात मार्च महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीच्या काळात महानगरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नंतर गाव, खेड्यात सुद्धा प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येने उच्चांकी गाठली. या महिन्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन हजारावर पोहचली. त्यासह ॲक्टिव्ह रुग्ण सुद्धा एक हजारांवर झाले होते.

त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा जिल्ह्यात गुणाकार सुरू असल्याचे दिसून आले होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात मात्र कोरोनाग्रस्तांच्या संख्या सतत कमी होत असल्याचे दिसून आले. ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक ३३ पॉझिटिव्ह रुग्ण १३ ऑक्टोबररोजी आढळले.

परंतु यापूर्वीच्या महिन्यात मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या प्रतिदिवशी शंभरावर जावून पोहचली होती. दरम्यान रुग्ण संख्या घटत असल्यामुळे त्याचा आरोग्य विभागावरील कामाचा ताण कमी झाला आहे. त्यामुळे आता कोविड केअर सेंटर सुद्धा कमी करण्यात आले असून ११ केंद्र बंद करण्यात आले आहेत.

कोरोना वार्डसुद्धा बंद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे संचालित सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी तत्पर ठेवण्यात आलेले चार वार्ड सुद्धा तूर्तास बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालयात आता कोरोना वार्डांची संख्या १५ वरुन ११ झाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यास बंद केलेले वार्ड पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.


मार्च, एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधितांवर उपचार करता यावा यासाठी जिल्ह्यात कोविड केअर सेंटरसाठी शासकीय इमारती ताब्यात घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी ११ इमारतीवरील ताबा तूर्तास सोडून देण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील काही व आयुर्वेदीक रुग्णालयातील कोविड केअर सेंटर सध्या सुरू ठेवण्यात आले आहेत.
- संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top