जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांना ‘ग्रहण’, तीन मार्गांचे कामांना सुरुवातच नाही 

Akola News: Bad condition of national highways in the district, work of three lanes has not started yet
Akola News: Bad condition of national highways in the district, work of three lanes has not started yet

अकोला  ः जिल्ह्यातील तीन राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचे भिजत घोंगडे आहे. त्यात अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा, अकोला-अकोट आणि अकोला-सांगारेड्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ या मार्गांचा समावेश आहे. तीन महामार्गांवरील खड्ड्यांनी व खोदून ठेवलेल्या रस्त्यांनी वाहनधारक त्रस्त झाले आहेत. अनेकांना या महामार्गांवर प्राणास मुकावे लागले असून, अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.


विदर्भासारख्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या परिसरातून वाहतुकीच्या सुविधा निर्माण करीत या भागाला आर्थिक संपन्नतेचे मार्ग दाखविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी अकोला जिल्ह्याला देशाच्या चारही दिशांनी जोडणारे रेल्वे आणि रस्त्यांची कामे केली जात आहे. मात्र रेल्वे असो की राष्ट्रीय महामार्ग सर्वच कामांना अकोला जिल्ह्यात सध्या ‘ग्रहण’ लागले आहे. गेले अनेक वर्षांपासून या मार्गांची कामे अपूर्ण अवस्थेत असून, नागरिक या रस्त्यांनी वाहन चालविताना नरकयातना भोगताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, अकोला जिल्ह्याचे शेजारी जिल्हे बुलडाणा, वाशीम आणि अमरावती या तिन्ही जिल्ह्यात याच मार्गावरील कामांनी गती पकडली आहे. मात्र अकोला जिल्ह्यात या तिन्ही मार्गांचे कामे अद्याप सुरू होऊ शकली नाहीत.


अकोला-अकोटला पुढील आठवड्याचा मुहूर्त
अकोला ते अकोट हा कंत्राटदारांच्या बाबत वादग्रस्त ठरलेल्या मार्गाचे नव्याने कंत्राट देण्यात आले आहे. यापूर्वी पुण्यातील एम.बी. पाटील कंपनीला काम देण्यात आले होते. मात्र कंपनीला दिलेल्या मुदतीत काम करता आले नाही. मुदतवाढ देवूनही काम न झाल्याने अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर या मार्गाचे काम पुण्यातील प्रथमेश कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून काम सुरू करण्यासाठी आवश्यक जुळवाजुळव केल्यानंतर आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कामाला सुरुवात होण्याची शक्यता राष्‍ट्रीय महामार्ग विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग सहासाठी आणखी किती प्रतीक्षा?
अकोला जिल्हा व शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या कामासाठी सन २०१५ पासून प्रतीक्षा सुरू आहे. जे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते त्या मार्गाच्या कामाला बुलडाणा जिल्ह्यात गती मिळाली असली तरी अकोल्यात मात्र अद्याप काम सुरू झाले नाही. या मार्गाचे कामही नव्याने देण्यात आलेल्या कार्यारंभ आदेशानुसार डिसेंबर २०२० मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. कंपनीकडून बँक गॅरंटीसाठी सुरू असलेली धडपड अद्याप संपली नसल्याने अमरावती ते खामगाव या टप्प्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असा प्रश्न वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे. जानेवारीमध्ये या मार्गाच्या कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.


वादग्रस्त कंपनीमुळे अकोला-मेडशी काम रखडले
अकोला ते सांगारेड्डी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ चे काम महाराष्ट्रात अकोला ते मेडशी, मेडशी ते वाशीम, वाशीम ते हिंगोली आणि हिंगोली ते नांदेड (वारंगा फाटा) या चार टप्प्यात करण्यात येत आहे. त्यातील मेडशी ते वाशीम या टप्प्यातील वाशीम ते मालेगावपर्यंतचे कामाला गती मिळाली आहे. अकोला ते मेडशी या टप्प्यातील काम मुंबई येथील मॉन्टेकार्लो कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने काम सुरू करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील पातूर येथे कार्यालय व प्लॅंट, कामगारांची निवसस्थाने तयार केली आहेत. मात्र कामगारांचे वाद, मंजुरीपेक्षा अधिक खोदकाम यामुळे पहिल्या महिन्यातच ही कंत्राटदार कंपनी वादग्रस्त ठरली आहे. कंपनीने केलेल्या अतिरिक्त खोदकामासह बनावट नाहरकत प्रमाणपत्राबाबत पातूर येथे महसूल व पोलिस प्रशासनाकडून कंपनीची चौकशी सुरू आहे. कंपनीच्या वादग्रस्त कामामुळे अकोला ते मेडशीपर्यंतच्या टप्प्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम मात्र रखले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com