esakal | Success Story: ‘विठ्ठला’च्या पायी बहादुरा गाव ठरले भाग्यवंत..!, शेळी पालनातून गावाची प्रगतीकडे वाटचाल
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Bahadur village is lucky ..!, Goat rearing moves towards progress of the village

तालुक्यातील बहादूरा गावातील युवकांना शेळी पालन व्यवसायातून स्वयंरोजगार मिळाला असून इतरांसाठी देखील विकास व रोजगाराची प्रेरणा देणारे हे गाव ‘मॉडेल’ ठरले आहे. येथील दृढनिश्चयी माजी सरपंच विठ्ठल माळी यांनी केवळ समाजकारणाच्या आवडीतून गावातील बेरोजगार युवकांना शेळी पालनातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

Success Story: ‘विठ्ठला’च्या पायी बहादुरा गाव ठरले भाग्यवंत..!, शेळी पालनातून गावाची प्रगतीकडे वाटचाल

sakal_logo
By
अनिल दंदी

बाळापूर (जि.अकोला) : तालुक्यातील बहादूरा गावातील युवकांना शेळी पालन व्यवसायातून स्वयंरोजगार मिळाला असून इतरांसाठी देखील विकास व रोजगाराची प्रेरणा देणारे हे गाव ‘मॉडेल’ ठरले आहे. येथील दृढनिश्चयी माजी सरपंच विठ्ठल माळी यांनी केवळ समाजकारणाच्या आवडीतून गावातील बेरोजगार युवकांना शेळी पालनातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

संपूर्ण गाव ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्यासाठी त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे पंढरीचा विठ्ठल पावेलच परंतु गावातील ‘विठ्ठल’ मात्र गावकऱ्यांना नक्कीच पावला आहे.


बाळापूर तालुक्यातील बहादुरा हे केवळ एक हजार लोकसंख्या असलेले गाव. गावात सर्वत्र बेरोजगारी. युवकांच्या हाताला काम नसल्याने तरुणवर्ग व्यसनाधीनतेकडे वळलेले होते. अशातच गावची हि परीस्थिती विठ्ठल माळी यांना बघवत नव्हती. सन २०१५ मध्ये माळी हे सरपंच असताना त्यांनी गाव विकासाचे ध्येय स्वीकारले.

त्यांचा विश्‍वास कृतीत आणण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गावकऱ्यांची बैठक घेऊन शेळी पालनाचे महत्त्व गावकऱ्यांना पटवून दिले. सुरुवातीला दहा शेतकरी मिळून त्यांनी स्वतः गोट फार्म सुरू केले. या व्यवसायातून नफा मिळाल्याने गावातील ईतर नागरिकांनाही या व्यवसायात त्यांनी आणले.

शेती बरोबरच शेळी पालन हा जोडधंदा संपूर्ण गावकऱ्यांनी सुरू केला आहे. आज गावातील प्रत्येक कुटुंबाकडे दहा ते पंधरा शेळ्या आहेत. या व्यवसायातून महिण्याला पंधरा ते विस हजार रुपये निव्वळ नफा गावकऱ्यांना मिळतो. एकूण सहाशे शेळ्या गावात आहेत.

सावकाराच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका
वर्तमानातील पैशाची निकड भागवण्यासाठी आणि बँकामधील कागदपत्रांच्या जाचापासून वाचण्यासाठी माणूस सावकाराकडे जातोच. बहादुरा येथील शेतकरी सुद्धा सावकाराच्या कचाट्यात सापडले होते. गावातील सावकारांनी या शेतकऱ्यांना भिकेला लावले होते. मात्र शेळी पालनाच्या व्यवसायातून आर्थिक बाजू बळकट झाल्याने सावकारी जाचातून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. याचे समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते.


बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी
गावातील नागरिकांना शेळीपालन व्यवसायामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. मात्र शेळी, बोकडाच्या खरेदी विक्रीसाठी शेगाव, अकोला याठिकाणी जावे लागते. त्यामुळे गैरसोय होते. गावातच चांगली बाजारपेठ उपलब्ध करून यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

‘ॲग्रोवन’ ठरला मार्गदर्शक
ॲग्रोवन वाचनातूनच खरी प्रेरणा मिळाली असून ॲग्रोवन खरा मार्गदर्शक असल्याचे माजी सरपंच विठ्ठल माळी सांगतात. ॲग्रोवन पासून खरी प्रेरणा घेतल्याने गावाची प्रगती कडे वाटचाल सुरू आहे.गावातील नागरिकांच्या सहकार्याने आम्ही गाव स्मार्ट व्हिलेज बनविणार आहोत, असे माळी यांनी सांगितले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image