धमक्यांना घाबरून तरुणीची आत्महत्या, आरोपी म्हणतो आम्ही तुम्हाला सोडणार नाही 

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 29 October 2020

काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या तळेगावात एका तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला होता. पीडित मुलगी आणि आरोपी हे एकमेकांच्या घराजवळच राहत होते.

हिवरखेड (जि.अकोला)  ः काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या तळेगावात एका तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला होता. पीडित मुलगी आणि आरोपी हे एकमेकांच्या घराजवळच राहत होते.

या प्रकरणी विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शिवाजी नाजुकराव शिंगोकार आणि नाजुकराव शिंगोकार (रा. तळेगाव बाजार) या दोन्ही आरोपींविरुद्ध विनयभंगासह ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपींना अटक केली होती.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर चिडून जाऊन आरोपितांनी तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांना धमक्या देण्यास सुरुवात केली. तू तक्रार मागे घे, नाहीतर तुझ्या कुटुंबाला मारून टाकू, तुम्हाला गावात राहू देणार नाही. अशा गंभीर स्वरूपाच्या धमक्या दिल्या. सोबतच आरोपींनी अफवा पसरवली की मुख्य आरोपीची तब्येत खराब आहे, त्याचे जीवाचे बरेवाईट झाले तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. असेही पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. या सर्व धमक्यांना घाबरून पीडित तरुणीने आत्महत्या केली. हिवरखेड नजीकच्या तळेगाव येथील या ह्रदयद्रावक घटनेनं संपूर्ण समाजमन हादरून गेल आहे.

आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान या प्रकरणी आरोपी डिगांबर उर्फ बबलू नाजूक शिंगोकार, अजय शिवाजी शिंगोकार, वनिता शिवाजी शिंगोकार, मीणा डिगांबर शिंगोकार, मनोरमा नाजुक शिंगोकार, नाजूक गुलाबराव शिंगोकार, शिवाजी नाजूक शिंगोकार, गौरी शिवाजी शिंगोकार (सर्व रा. तळेगाव बाजार) या ८ जणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी बहुतांश आरोपींना अटक केली आहे.

दुसऱ्या गटातील आरोपींवर सुद्धा गुन्हे दाखल
दुसरीकडे विनयभंग प्रकरणातील आरोपीने सुद्धा ४ जणांच्या विरोधात शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या आणि इतर स्वरूपाच्या तक्रारी दिल्यामुळे हिवरखेड पोलिसांनी ४ आरोपींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Young woman commits suicide due to threats, accused says we will not let you go