घरफोडीचे सत्र सुरूच, पोलिस स्टेशनपासून 60 फुटाच्या अंतरावर फोडली सहा दुकाने

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 10 October 2020

मढ येथील घरफोडीच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच चोरट्यांनी धाड येथे नंगानाच केला. स्थानिक पोलीस स्टेशन पासून अवघ्या ६० फूट अंतरावर असलेल्या ६ दुकान फोडून हजारोंचा ऐवज लंपास केला. ८ ऑक्टोबरच्या रात्री १२.३० ते १ दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांनामध्ये दहशत निर्माण झाली आहे.

धाड (जि. बुलडाणा)  ः मढ येथील घरफोडीच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच चोरट्यांनी धाड येथे नंगानाच केला. स्थानिक पोलीस स्टेशन पासून अवघ्या ६० फूट अंतरावर असलेल्या ६ दुकान फोडून हजारोंचा ऐवज लंपास केला. ८ ऑक्टोबरच्या रात्री १२.३० ते १ दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांनामध्ये दहशत निर्माण झाली आहे.

धाड पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मढ (ता. बुलडाणा) येथे १ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी २ ठिकाणी घरफोड्या केल्या होत्या. या घटनेला आठ दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच आज ९ ऑक्टोबरच्या पहाटे चोरट्यांनी धाडमध्ये धुमाकूळ घालत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ६ दुकाने फोडली.

यामध्ये धाड पोलिस स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर असलेले चिरानिया ट्रेडर्स कंपनीच्या छताचे लोखंडी टिनपत्र वाकवून चोरट्याने दुकानात प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यातून हजारो रुपयांची रोकड लंपास केली.

त्यानंतर लक्ष्मी बिकानेर स्वीटमार्ट फोडून १० ते १५ हजार रुपये, रॉयल इलेक्ट्रिकल फोडून पॉलिकेप वायरचे १२-१३ बंडल ( किंमत अंदाजे १५ हजार रुपये) तर सोनल ऍग्रो ट्रेडर्स, वर्षा इलेक्ट्रिक, रॉयल इलेक्ट्रिकल व शेतकरी ट्रेडर्सही फोडले.

मात्र, उपरोक्त दुकानांमध्ये चोरट्यांना हजार-दिड हजाराच्या रोकडवरच समाधान मानावे लागले. एकाच रात्री ७ दुकाने फुटल्याने व्यापाऱ्यांमध्ये कमालीची दहशत पसरली असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. या प्रकरणी उपरोक्त व्यापाऱ्यांनी धाड पोलिसांत तक्रारी दिल्या असून वृत्त लिहेस्तोवर कोणताच गुन्हा दाखल झाला नव्हता.

नग्न चोरटा सीसी कॅमेऱ्यात कैद
अंगावर एकही वस्त्र नसलेल्या नग्नावस्थेतेतील चोरट्याने टिनपत्रे वाकून चिरानिया ट्रेडर्समध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर दुकानातील गल्ल्याकडे धाव घेतली. गल्ला उघडून त्यात असलेली हजार-दीड हजार रुपये रोकड घेऊन परतीचा मार्ग धरला. मात्र, चोरीला अंजाम देतांना उपरोक्त चोरटा सीसी कॅमेऱ्यात कैद झाला.

(संपादन - विवेक मेतकर, अकोला)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Burglary season continues, six shops blown up at a distance of 60 feet from the police station