सरपंचपद आरक्षण रद्दमुळे निवडणूक खर्चाकडे लक्ष, ग्रामपंचायत निवडणुकीत वाढली रंगत

पी.डी. पाटील
Thursday, 24 December 2020

तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ता.२३ डिसेंबरला नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.

रिसोड (जि.वाशीम)  : तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ता.२३ डिसेंबरला नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.

यातच ग्रा.पं.निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच झाली. ही सोडत झाल्यानंतर भावी सरपंच, राजकीय नेते, पॅनल प्रमुख आदींची मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र, राज्य सरकारने सरपंच पदाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने भावी सरपंच, पॅनल प्रमुख आणि गावातील प्रमुख नेत्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

उमेदवार व त्यासाठी लागणारा खर्च कोण करणार ? असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. तहसीलदार तथा निवडणूक अधिकाऱ्यांनी ता.७ डिसेंबर रोजी आरक्षण जाहीर केले होते. सरपंच पद सोडत जाहीर होताच ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले. निवडणुकीसाठी अनेक नेत्यांसह इच्छुकांनी कंबर कसून मोर्चेबांधणीला सुरुवात केली. आपापले कार्यकर्ते कामाला लावले होते तर पॅनल प्रमुख उमेदवारांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठी कसरत करताना दिसत होते.

परंतु, सरपंच पद आरक्षण रद्द केल्याने या पदाचे उमेदवार आणि पॅनल प्रमुख यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. आता गावगाडा चालवणाऱ्या नेत्यांनी नव्या समिकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. आपल्या मर्जीतील विश्वासू सदस्यांना पॅनलमध्ये स्थान देताना दिसत आहेत. यासाठी पॅनल प्रमुखासह भावी सरपंचांची चांगलीच दमछाक होत आहे.

खर्च कोण करणार ?
ऐरवी निवडणुकीपूर्वी ग्रामपंचायत आरक्षण सोडत होत असतात. गावगाडा चालवणारे गावातील प्रतिष्ठित नेते आपल्या मर्जीतील तथा समर्थन देणाऱ्या उमेदवारांनाच पॅनलमध्ये सामावून घेतात. त्याला फक्त निवडणुकीसाठी उभे ठाकावे लागते. परंतु, निवडणुकीपूर्वीच सरपंच पद आरक्षण सरकारने रद्द केल्याने मनपसंतीचा सरपंच आणि त्यासाठी करावा लागणारा खर्च नेमका कोणता नेता करणार ? तसेच कोणत्या उमेदवारावर हा खर्च करायचा असा सवाल उपस्थित होत आहे.

इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग
सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने अनेक हौसे-गवसे इच्छुक उमेदवारही ग्रामपंचायत निवडणुकीत उत्साह दाखवत आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवारांची संख्या वाढणार हे मात्र निश्चित आहे. आपणच भावी सरपंच होणार या विश्वासाने इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: With the cancellation of Sarpanchpada reservation, attention has been paid to the election expenses