esakal | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज अकोल्यातील ‘जॉइंट ॲग्रोस्को’चे उद्‍घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Chief Minister inaugurates Joint Agrosco in Akola today

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तथा महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या ‘संयुक्‍त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक २०२० चे (जॉइंट ॲग्रोस्को) उद्‍घाटन आज (ता.२७) दुपारी १२.१० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज अकोल्यातील ‘जॉइंट ॲग्रोस्को’चे उद्‍घाटन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तथा महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या ‘संयुक्‍त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक २०२० चे (जॉइंट ॲग्रोस्को) उद्‍घाटन आज (ता.२७) दुपारी १२.१० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते होणार आहे.

महाराष्ट्राचे कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणाऱ्या या उद्‍घाटन समारंभाचे प्रसंगी केंद्रिय राज्यमंत्री संजय धोत्रे, राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू, सहकार, कृषी, राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे महासंचालक विश्वजीत माने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या महत्त्वाकांक्षी संशोधनात्मक बैठकीचे प्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ.के.पी. विश्वनाथा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ.ए.एस. ढवण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ.एस.डी. सावंत सुद्धा विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत. या राज्यस्तरीय बैठकीचे यजमानपद भूषविणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ.व्ही.एम. भाले कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षपद भूषविणार आहेत.

 


२०८ शिफारसींचे होणार सादरीकरण
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कृषी विद्यापीठाकडे चक्राकार पद्धतीने या महत्त्वाकांक्षी सभेचे यजमानपद असते व पाच दिवस चालणाऱ्या कृषीच्या या महाकुंभात राज्यांतर्गत तथा देशपातळीवर विविध पीक वाणे, यंत्रे-अवजारे तथा संशोधनात्मक शिफारसी व तंत्रज्ञान सादरीकरण चर्चा व सुधारणांसह प्रसारित करण्यात येते. यावर्षी चारही कृषी विद्यापीठांमधून एकूण २०८ शिफारसी या बैठकीमध्ये सादर होणार आहेत.

यामध्ये १६ पीक वाण, १२ यंत्रे व अवजारे तर १८० पीक उत्पादन तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाइन पद्धतीने ही बैठक संपन्न होणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)