काँग्रेसची गटबाजी आंदोलनातही सुरूच, दोन्ही गटाच्या नेते वेगवेगळे शक्तिप्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

राजकीय पक्ष आणि गटबाजी हे समीकरण ठरलेलेच आहे, मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नावर जर एखादे आंदोलन होत असेल तर आपसातील गटबाजी बाजूला ठेवून एकत्रितरीत्या मागणी केल्यास त्याचा जास्त उपयोग होतो. याचा विसर मेहकरातील काँग्रेसला पडला आहे.

बुलडाणा : राजकीय पक्ष आणि गटबाजी हे समीकरण ठरलेलेच आहे, मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नावर जर एखादे आंदोलन होत असेल तर आपसातील गटबाजी बाजूला ठेवून एकत्रितरीत्या मागणी केल्यास त्याचा जास्त उपयोग होतो. याचा विसर मेहकरातील काँग्रेसला पडला आहे.

त्यामुळेच नुकत्याच झालेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या नेते व कार्यकर्त्यांनी वेगळे शक्तिप्रदर्शन करून आपण कसे मोठे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

केंद्र शासनाने शेतकरी व कामगारांच्या विरोधात जे कायदे केले आहेत ते कायदे काळे आहेत आणि ते रद्द करावे, यासाठी काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात आले. त्याचप्रमाणे मेहकर मध्ये हि या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर व मेहकर विधानसभा पक्ष नेते ऍअ‍ॅड. अनंतराव वानखेडे यांच्या नेतृत्वात एका ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला प्रतिसादही चांगला मिळाला तर दुसरीकडे मेहकरचे माजी नगराध्यक्ष कासम गवळी, काँग्रेसचे नेते लक्ष्मणराव घुमरे, तालुकाध्यक्ष देवानंद पवार यांच्या नेतृत्वात ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली.

याही रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह चांगला दिसून आला. मात्र ज्या पद्धतीने जिल्ह्यातील इतर ठिकाणी लोणार असो की चिखली या ठिकाणी ज्या पद्धतीने एकच रॅली निघून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले तसा प्रयत्न मेहकर मध्ये झाला नाही. एकत्रित रॅली निघाली असती तर त्याचा वेगळा परिणाम दिसून आला असता.

दुसरी बाब अशी की मोठ्या नेत्यांच्या गटबाजी मध्ये कुचंबणा होते ती छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची. कारण छोटे-मोठे कार्यकर्ते सर्वांशीच सलोख्याचे संबंध ठेवून असतात मात्र अशा वेळी दोन गटांमध्ये वेगवेगळे शक्तिप्रदर्शन होत असेल तर नेमके कुणाच्या गटात दाखल व्हायचे की घरी राहायचे. याचा विचार सर्वसामान्य नागरिक कार्यकर्ते करीत असतात.

मात्र समंजसपणे नेत्यांनीच भूमिका घेऊन किमान सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करताना तरी आपली एकी दाखविणे आवश्यक आहे. काँग्रेसमधील गटबाजी हा नवीन विषय नाही. परंतु आता केंद्र शासनाच्या विरोधात जर काँग्रेसला लढा द्यायचा असेल तर अशा प्रकारच्या गटबाजीचे प्रदर्शन करण्यापेक्षा एकत्रित वज्रमूठ बांधली तर त्याचा परिणाम निश्चितच चांगला दिसेल यात शंका नाही.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Congress factionalism continues in the movement