मनसे जिल्हाध्यक्षांनी लगावली अधिकाऱ्याच्या कानशिलात; कर्चमाऱ्यांचे कामबंद आंदोलन

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 12 November 2020

दुय्यम उपनिबंधक वर्ग २ यांच्या मग्रुर व बेशिस्त वागणुकीच्या तक्रारी संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देवूनही त्यांच्या वागणुकीत कोणताही बदल न झाल्याचा आरोप करून बुधवारी ता. ११ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांनी येथील दुय्यम उपनिबंधक अधिकांऱ्याच्या कानशिलात लगावण्याचा प्रकार घडला. 

चिखली (जि.बुलडाणा)  : दुय्यम उपनिबंधक वर्ग २ यांच्या मग्रुर व बेशिस्त वागणुकीच्या तक्रारी संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देवूनही त्यांच्या वागणुकीत कोणताही बदल न झाल्याचा आरोप करून बुधवारी ता. ११ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांनी येथील दुय्यम उपनिबंधक अधिकांऱ्याच्या कानशिलात लगावण्याचा प्रकार घडला.

 

याबाबत सविस्तर असे की, चिखली येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हुकूमशाही पद्धतीने वागत असून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मदन गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिऱ्यांकडे केली हेाती. मात्र या निवेदनावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे शेतकऱ्यांना नागविण्याचा प्रकार सुरूच होता. बहुसंख्य शेतकऱ्यांना दस्तनोंदणी करण्याकरिता रजिस्टर कार्यालयात जावे लागते, 

 

मात्र चिखली येथील दुय्यम उपनिबंधक अधिकारी कळसकर या अधिकार्‍याच्या जाचाला असंख्य शेतकरी कंटाळले होते. शेतीसंदर्भातील कामाकरिता प्रत्येक शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याशिवाय काम करीत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करीत मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कार्यालय गाठले व त्यानी जाब विचारला असता त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे मदानराजे गायकवाड यांनी उपनिबंधकांच्या कानशिलात लगावली.

या घटनेमुळे दुय्यम उपनिबंधक कार्यालयात एकच खळबळ उडाली व यावेळी उपस्थित मनसे कार्यकर्त्यांनी मनसे जिंदाबाद, मदनराजे तुम आगे बढो अशा घोषणांनी कार्यालय दणाणून सोडले. दरम्यान, दुय्यम निबंधक कळसकर यांनी पोलीस स्टेशन गाठत घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ यांना दिली. त्यांच्यासमवेत दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संपूर्ण महाराष्ट्रात कामबंद आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

शेतकर्‍यांसाठी गुन्हे अंगावर घेण्यास तयार : मदनराजे गायकवाड
मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुचनेनुसार अधिकारी हात जोडूनही ऐकत नसल्यास तर अशा मग्रुर अधिकार्‍यास मनसे स्टाईलने धडा शिकविण्याच्या सुचना असल्याने दुय्यम निबंधक कळसकर यांना वारंवार विनंती करूनही त्यांनी आपला हेकेखोरपणा न सोडल्यामुळे नाईलाजस्तव त्यांना मी चोप दिला असून, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काकरिता भविष्यात कितीही गुन्हे अंगावर घेण्यास तयार आहे.

दुय्यम निबंधकांचा रक्तदाब वाढला
घटनेनंतर दुय्यम निबंधक कळसकर हे पोलिस स्टेशन कार्यालयात फिर्याद देण्याकरिता गेले असतांना अचानक त्यांचा रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. 

(संपादन - विवेक मेतकर)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: MNS district president puts a stone in the ear of an officer; Work stoppage movement of workers