esakal | मक्याच्या नोंदणीसाठी झुंबड, शेतकर्‍यांनी केंद्रावरच ठोकला मुक्काम; भरउन्हात लावल्या रांगा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Crowd for maize registration, farmers stay at the center; Rows in full sun

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मका खरेदीसाठी सोमवारपासून नोंदणी सुरू झाली आहे. दरम्यान, तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी रविवार पासूनच अंथरून पांघरूण घेऊन येथे मुक्काम केला.

मक्याच्या नोंदणीसाठी झुंबड, शेतकर्‍यांनी केंद्रावरच ठोकला मुक्काम; भरउन्हात लावल्या रांगा

sakal_logo
By
शाहीद कुरेशी

मोताळा (जि.बुलडाणा) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मका खरेदीसाठी सोमवारपासून नोंदणी सुरू झाली आहे. दरम्यान, तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी रविवार पासूनच अंथरून पांघरूण घेऊन येथे मुक्काम केला. सोमवारी सकाळी नोंदणी सुरू झाल्यावर शेतकऱ्यांची एकच झुंबड उडाली होती. मात्र नियोजनाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांचे हाल झाल्याचे दिसून आले.


शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार किंमत आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत मका खरेदीसाठी आज (ता.2) पासून नोंदणी सुरू झाली आहे. एका खरेदी केंद्रा मार्फत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवारी सकाळी नोंदणी सुरू झाली.

दरम्यान, तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी रविवारी सकाळ पासूनच याठिकाणी तळ ठोकला होता. जवळपास दोनशे ते अडीचशे शेतकरी अंथरून पांघरून घेऊन आले होते. त्यांनी बाजार समितीच्या आवारातच मुक्काम केला. परंतु येथे सुविधांचा अभाव असल्याने शेतकर्‍यांना कमालीचा त्रास सहन करावा लागला.

सोमवारी सकाळी नऊ ते साडे नऊ वाजताच्या सुमारास नोंदणीला सुरुवात झाली. यावेळी शेतकर्‍यांची भली मोठी रांग लागली होती. दुपारी बारा वाजताच्या सुमारास जवळपास साडे तीनशे शेतकर्‍यांची नोंदणी झाली होती. तरी, शेकडो शेतकरी आपला नंबर येण्याची वाट पाहत उन्हात ताटकळत उभे होते.

मागील वर्षी शासकीय खरेदी केंद्रावर नोंदणी करूनही खरेदी बंद पडल्याने शेकडो शेतकरी वंचित राहिले होते. त्यामुळे यंदा शेतकर्‍यांनी सुरुवातीलाच नोंदणी करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसत आहे. संबंधीत यंत्रणेने नोंदणीसाठी येणार्‍या शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

काही शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक
काही जणांकडे एका पेक्षा जास्त नोंदणी अर्ज असल्याने रांगेतील इतर शेतकर्‍यांनी आक्षेप घेत विरोध केला. त्यामुळे काही शेतकर्‍यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. परंतु इतर शेतकर्‍यांनी मध्यस्ती केल्याने तणाव निवळला.


मी रविवारी दुपारपासूनच येथे नंबर लावला आहे. रात्री येथेच मुक्काम केला. जवळपास दोनशे ते अडीचशे शेतकरी मुक्कामी होते. सकाळी आणखी गर्दी वाढण्यास सुरुवात झाली.
- संजय नारखेडे, शेतकरी, रा. बोराखेडी.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image