esakal | धम्मचक्र प्रवर्तन सोहळा, मिरवणूक रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: DhammaChakra ceremony, procession canceled

भारतीय बौद्ध महासभा आयोजित धम्मचक्र प्रवर्तन सोहळा जाहीर सभा आणि मिरवणूक रद्द करण्यात आली असून केवळ ऑनलाईन सभा आणि सामूहिक वंदना एवढेच मर्यादित कार्यक्रम केला जाईल, अशी माहिती वंचितचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी दिली आहे.

धम्मचक्र प्रवर्तन सोहळा, मिरवणूक रद्द

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : भारतीय बौद्ध महासभा आयोजित धम्मचक्र प्रवर्तन सोहळा जाहीर सभा आणि मिरवणूक रद्द करण्यात आली असून केवळ ऑनलाईन सभा आणि सामूहिक वंदना एवढेच मर्यादित कार्यक्रम केला जाईल, अशी माहिती वंचितचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी दिली आहे.

सन १९८७ पासून अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा सार्वजनिक पातळीवर सुरु आहे. या सोहळ्याचे नेतृत्व दरवर्षी  प्रकाश आंबेडकर हे करत असतात. या दिवशी विशाल मिरवणूक, आखाडे, लेझीम पथके, आकर्षक देखावे, विविध झाक्या, हजारों बौद्धांचा सहभाग, भारतीय बौध्द महासभेचे शिस्तबद्ध आयोजन, आणि जाहीर सभा असा दरवर्षीचा शिरस्ता असतो. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर ९ ऑक्टोबर २०१९ रोजी ६३वा धम्म मेळावा आयोजित केला गेला होता.

नागपूरच्या धम्म सोहळ्याचा कार्यक्रम होऊन अनेक अनुयायी बुलढाणा, वाशीम व मराठवाडा भागात परत जाताना अकोला रेल्वे स्टेशनवर मुक्कामी असत, कारण त्याकाळी फार दळणवळणाची साधने नव्हती. या अनुयायांना राहण्याची सोय होईल या प्राथमिक उद्देशाने सन १९८६ साली पहिला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम अशोक वाटिके समोरील मैदान पोस्ट ऑफीस मागे संपन्न झाला.

नागपूरनंतर संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा हा भव्य सोहळा ठरला आहे. वसंत देसाई स्टेडीयम वर अनेक वर्षे हा कार्यक्रम होत होता, मात्र आता मागील १० वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर हा सोहळा संपन्न होत असून यावर्षी हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.

दरवर्षी प्रमाणे अॅड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे प्रमुख मार्गदर्शनात धम्मचक्र प्रवर्तन सोहळा साजरा केला जातो.त्यानिमित्ताने भव्य मिरवणूक आणि जाहीर सभेचे आयोजन केले जाते.ह्या वर्षी कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने मिरवणूक आणि जाहीर सभा न घेता प्रातिनिधिक कार्यक्रम करण्याचे जिल्हा प्रशासनास बैठकीत सांगितले गेले होते.
मात्र सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असल्याचे खासदार राऊत ह्यांनी जाहीर केल्याने आपणही जाहीर सभा आणि मिरवणूक काढायचे असे पदाधिकारी यांनी ठरविले होते.

आज सेनेचा मेळावा रद्द झाल्याचे जाहीर होताच बौद्ध महासभा आयोजित मिरवणूक व जाहिरसभा रद्द करण्याचा निर्णय पदाधिकारी ह्यांनी घेतला.मर्यादित संख्येत आणि नियमांचे पालन करून ऑनलाईन सभा व सामूहिक वंदना घेण्याचे ठरविले गेले.त्याबाबत बौद्ध महासभा पत्रक काढून सविस्तर माहिती देणार आहेत.
ह्या विषयी आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष पी जे वानखडे, वंचित जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, बौद्धमहासभा महासचिव एम आर इंगळे, भाऊसाहेब थोरात, विजय जाधव, महानगर अध्यक्ष विश्वास बोराळे, महासचिव किरण पळसपगार जिल्हा संघटक रामेश्वर गायकवाड सर, प्रामुख्याने उपस्थित होते.

संपादन - विवेक मेतकर