हद्दवाढीतील गावांसाठी तयार होणार डीपीआर, महानगरपालिका देणार जीवन प्राधिकरणला दोन कोटी 

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 26 November 2020

महानगरपालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर अकोला शहरात समाविष्ट झालेल्या भागात अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून कामे केली जाणार आहे. त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला सोपविण्यात आले आहे. त्यासाठी मनपा दोन कोटी रुपये प्रकल्प व्यवस्थापन शुल्क देणार आहे.

अकोला : महानगरपालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर अकोला शहरात समाविष्ट झालेल्या भागात अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून कामे केली जाणार आहे. त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला सोपविण्यात आले आहे. त्यासाठी मनपा दोन कोटी रुपये प्रकल्प व्यवस्थापन शुल्क देणार आहे.

अकोला शहराच्या मूळ हद्दीमध्ये अमृत योजनेतून पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार योजना राबविण्यात आली. त्यातील पाणीपुरवठ्याचे कामासंह भूमिगत गटार योजनेचे कामही अर्धवट आहे. अशा परिस्थितीत अकोला शहर व हद्दवाढीसाठी अमृत योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे करण्यासाठी या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम मजीप्रा करणार आहे. त्यात योजना राबविण्यासाठी सर्वेक्षण, आराखडे तयार करणे व अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामांचा समावेश आहे. त्यासाठी अकोला महानगरपालिकेतर्फे मजीप्राला दोन कोटी प्रकल्प व्यवस्थापन शुल्क द्यावे लागणार आहे.

हेही वाचा -  अकोला, वाशीम जिल्ह्यात बसविणार ‘डमी वॉर टँक

महापौरांनी दिले आयुक्तांना पत्र
अकोला महानगरपालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर अमृत योजनेतील दुसऱ्या टप्प्याच्या डीपीआर तयार करण्यासाठी मजीप्राला दोन कोटी रुपये प्रकल्प व्यवस्थापन शुल्क देण्याचे नियोजित आहे. त्यासाठी महापौर अर्चनाताई मसने यांनी सोमवार, ता. २३ नोव्हेंबर रोजी आयुक्तांना पत्र देवून संबंधित विभागाला दोन कोटी रुपये मजीप्राकडे भरणा करण्याबाबत आदेशित करण्यासंदर्भात सूचना केली आहे.

निधी देणार कोठून?
मनपातर्फे मजीप्राला देण्यात येणाऱ्या दोन कोटीचा निधी कोणत्या फंडातून देण्यात येणार आहे, याबाबत महापौरांच्या पत्रात कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे हा निधी मनपा फंडातून दिला जाणार का की अन्य कोणत्या योजनेतील निधी प्रकल्प व्यवस्थापन शुल्क म्हणून मनपाला दिला जाणार आहे, याबाबत मनपा वर्तुळात चर्चा आहे. मनपा फंडात निधी नसल्याचे कारणावरून कर्मचाऱ्यांच्या वेतनही थकीत ठेवण्यात आले होते. त्यामुळे आता मजीप्राला देण्यात येणाऱ्या दोन कोटीची व्यवस्था कोणत्या निधीतून प्रशासन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

अर्धवट कामांचाही समावेश
अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला शहराच्या वाढीव हद्दीतील कामांसोबतच शहराच्या मूळ हद्दीत अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातून करण्यात आलेल्या कामातील अर्धवट असलेली कामेही पूर्ण केली जाणार आहे. त्यात पाणीपुरवठा योजनेसह भूमिगत गटार योजनेचा पुढील टप्पाही समाविष्ट आहे. पहिल्या टप्प्यात भूमिगत गटार योजनेसाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे दोन प्लाँट उभे करण्यात आले होते. शहरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी भूमिगत गटार तयरा करण्याचे काम दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: DPR to be prepared for border villages, Municipal Corporation will give Rs 2 crore to Jeevan Pradhikaran