कर्मचाऱ्यांच्या लेटलतिफीची सवयच सुटेना, आणखी ८२ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाची वेतन कपात

मनोज भिवगडे
Friday, 23 October 2020

महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी प्रशासकीय गाडा रुळावर आणण्याच्या दृष्टीने कारवाईची मालिकाच सुरू केली आहे. त्यानंतरही मनपा कर्मचाऱ्यांची लेटलतिफ आणि पूर्व सूचना न देता गैरहजर राहण्याची सवय सुटताना दिसत नाही. गुरुवारी पुन्हा ८२ कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश देण्यात आला.

अकोला : महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी प्रशासकीय गाडा रुळावर आणण्याच्या दृष्टीने कारवाईची मालिकाच सुरू केली आहे. त्यानंतरही मनपा कर्मचाऱ्यांची लेटलतिफ आणि पूर्व सूचना न देता गैरहजर राहण्याची सवय सुटताना दिसत नाही. गुरुवारी पुन्हा ८२ कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश देण्यात आला.

कोरोना संकट काळात मनपाची संपूर्ण यंत्रणा विषाणू संसर्ग रोखण्याच्या कामी लागली होती. त्यानंतर हळूहळू सर्व विभागांची नियमित कामे सुरू झाली आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना मध्यल्या काळात कामे न करण्याची सवय जडली.

त्याकडे कुणाचेही लक्ष नाही, असा समज करून कर्मचाऱ्यांनी वाट्टेल तेव्हा कार्यालयात येण्यास सुरुवात केली.

काही कर्मचारी तर सकाळी कार्यालयात चक्क हजेरी लावून स्वतःची खासगी कामे करण्यासाठी निघून जातात. काही तर हजेरी लावून घरी जाऊन आराम करतात आणि थेट सांयकाळीच उगवात असे दिसून आले. त्यामुळे आयुक्तांनी अशा कर्मचाऱ्यांच्या मुस्क्या आवारण्यास सुरुवात केली.

कार्यालयांची झाडझडती घेतल्यानंतर गैरहजर आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांवर बुधवार, ता. १५ ऑक्टोबरपासून सुरुवात केली. ही कारवाई सुरू होऊन आठवडा झाला. तरी कर्मचाऱ्यांची सवय मोडत नसल्याचे गुरुवारी ८२ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्यावर दिसून आले.

विभागनियाह गैरहजर कर्मचारी
मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये मनपा कार्यालयांचे हजेरी रजिस्‍टरांची तपासणी केली. त्‍यामध्‍ये एकूण ८२ कर्मचारी कार्यालयात उशिरा, गैरहजर असलेले आढळून आले. त्यात विधी विभागातील एक, बाजार, परवाना विभागातील १, आर.सी.एच. कार्यालयातील ९, सर्व शिक्षा अभियान कार्यालय ५, अभिलेखा विभागातील १, आरोग्‍य (स्‍वच्‍छता) १, विद्युत विभागातील १, विद्युत एल.बी.टी.गोडाउन वरील ६, क्षयरोग कार्यालय ५, एन.यु.एल.एम.कार्यालयातील ८, मलेरिया विभागातील ९, कोंडवाडा विभागातील ११, बांधकाम विभागातील २, मलेरिया पूर्व झोन कार्यालयातील १, भरतीया रुग्‍णालयातील ४, अतिक्रमण विभागातील ५, मोटर वाहन विभागातील २, उत्‍तर झोन करवसुली विभागातील ८, उत्‍तर झोन विद्युत विभागातील १, पश्चिम झोन कार्यालयातील १ असे एकूण ८२ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतनात कपात करण्‍यात आले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Employees do not give up the habit of lateness, 82 more employees get one day's pay cut