प्लॅस्टिक बंदी,तरी कचऱ्यात प्लॅस्टिक, जागोजागी लागले ढीग

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 22 October 2020

शहरातील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या बाजूलाच कचऱ्याचे ढिग बघावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा संकलन आणि स्वच्छतेच्या बाबतीत महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समस्या सुटण्याऐवजी गंभीर स्वरुप घेताना दिसत आहे.

 

अकोला  : शहरातील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या बाजूलाच कचऱ्याचे ढिग बघावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा संकलन आणि स्वच्छतेच्या बाबतीत महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समस्या सुटण्याऐवजी गंभीर स्वरुप घेताना दिसत आहे.

अकोला शहरातील मुख्य मार्गावर कचरापेट्या लावण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने गांधी रोडवरून फतेह चौकातून संतोषी माता चौकाकडे जाणारा मार्गावर रस्त्याच्या बाजूला असलेला कचरा प्रशासनासाठीही कायमची डोकेदुखी ठरतो आहे.

संतोषी माता चौक ते रेल्वे माल धक्का चौक, रेल्वे स्टेशन चौक ते अकोट फाईल पूल आणि अकोट फाईल पुल शिवाजी बागीच्या पासून ते अकोट स्टँड चौकापर्यंत कचऱ्याची समस्या गंभीर स्वरुप घेत आहे. ही समस्या जठारपेठ परिसरातील चौकातही बघावयास मिळत आहे. याशिवाय मुख्य बाजारपेठेतून जुने शहराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही कचऱ्याची समस्या गंभीर स्वरुप घेत आहे.

खासगी कंत्राटदाराकडून कचरा संकलन
अकोला महानगरपालिकेच्या ट्रॅक्टरसह खासगी कंत्राटदारांकडून ट्रॅक्टरने शहरातील कचरा संकलनाचे काम केले जाते.याशिवाय कचरा घंटा गाड्या या प्रभागात जाऊन कचरा संकलन करतात. मात्र मुख्य रस्त्यांवर टाकला जाणारा कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध होत नसल्याने हा कचरा दिवसभर पडून राहतो. त्यामुळे कचऱ्यांची समस्या गंभीर होताना दिसत आहे.

प्लॅस्टिक बंदी,तरी कचऱ्यात प्लॅस्टिक
शहरातील बाजार पेठेतून निघणारा कचरा मुख्य रस्त्यांवरच टाकला जातो. त्यावर कोणतेही नियंत्रण नाही. मनपाच्या कचरा संकलनासाठी घंटागाड्या फिरतात. त्यानंतरही रस्त्यांच्या बाजूला कचऱ्याचे ढिग आढळून येते. विशेष म्हणजे, त्यात प्लॅस्टिकचा कचरा असतो. प्लॅस्टिक बंदी असतानाही कचऱ्यात प्लॅस्टिक कसा येतो हा प्रश्नच आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Plastic ban, but plastic in the garbage, piles in places