खुशखबर! दोन लाख शेतकऱ्यांना मिळाला पहिला हप्ता

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपये मानधन देण्याची योजना सुरू केली आहे.

अकोला  ः केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपये मानधन देण्याची योजना सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ३२६ शेतकऱ्यांना पहिला हप्त्याचे मानधन मिळाले आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या सदर योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो.

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकरी वर्षाला त्वरीत या पैशांचा वापरही करता येतो. सरकारने या योजनेचा लाभ देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न चालवला आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्यासाठी थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी पीएम किसान संकेतस्थळावर जावून लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो.

या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय एक रुपयाही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत आपले नाव नोंदवता येत आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. अकोला जिल्ह्यातील जवळपास दोन लाखावर शेतकरी सदर योजनेचा लाभ घेत आहेत.

शेतकऱ्यांना असे मिळाले मानधन
- पहिला हप्ता - २ लाख ५ हजार ३२६
- दुसरा हप्ता - २ लाख ९९
- तिसरा हप्ता - १ लाख ८९ हजार ५५९
- चौथा हप्ता - १ लाख ३४ हजार ९८३
- पाचवा हप्ता - १ लाख २२ हजार ३५०
- सहावा हप्ता - ६८ हजार ७३०

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Farmers get support from PM Kisan, Two lakh farmers got first installment