पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची शेतात जागल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

सध्या रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री-बेरात्री गोठवणाऱ्या थंडीत जागल करीत आहे. भारनियमनामुळे रात्री उशिरा लाइन येते तर, दाब कमीअधिक झाल्यास जातेही. लाईन सुरू करण्यासाठी रात्रीला शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे.

शिरपूर जैन (जि.वाशीम) ः सध्या रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री-बेरात्री गोठवणाऱ्या थंडीत जागल करीत आहे. भारनियमनामुळे रात्री उशिरा लाइन येते तर, दाब कमीअधिक झाल्यास जातेही. लाईन सुरू करण्यासाठी रात्रीला शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे.

शेतात सध्या रब्बीची पिके उभी आहेत. कोवळ्या अंकुरलेल्या गहू, हरभरा या पिकांबरोबरच तूर, हळद या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्याला भारनियमनाच्या वेळापत्रकानुसार रात्री-बेरात्री शेतात जावे लागते. त्यातही लाईन आल्यानंतर सर्वांच्याच शेतातील मोटरपंप सुरू होत असल्याने विजेचा दाब कमी अधिक होतो.

त्यामुळे लाईनमध्ये बरेचदा फॉल्ड होतो. एवढ्या रात्री लाईनमनला पाहण्याऐवजी पिकांना पाणी दिले गेले पाहिजे म्हणून शेतकरी धावपळ करीत स्वतः लाईन सुरू करून घेत असल्याचे पाहायला मिळते. रात्रीला जागल करीत पिकाला पाणी देण्याबरोबरच वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी त्याला शेताच्या परिसरात गस्त घालावी लागते.

आठवड्यातील अर्धे दिवस रात्री तर, अर्धे दिवस दिवसाला शेतीसाठी वीज पुरवठा केला जातो. सरासरी आठ तास वीज पुरवठा शेतासाठी सुरू राहातो. त्यातही बरेचदा अडथळे येत असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा खेळखंडोबा होत असल्याचे शेतकरी सांगतात.

गहू, हरभरा या अंकुरलेल्या कोवळ्या पिकावर वन्यप्राणी देखील ताव मारतात. पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या बहुतांश वेळ शेतातच घालावा लागतो. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना कठीण स्थितीचा सामना करावा लागत आहे. जिवापाड जपलेल्या पिकांना जगवण्यासाठी शेतकरी सध्यातरी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Farmers wake up in their fields to irrigate their crops