esakal | साडेपाच हजारांवर शेतकरी लाभापासून वंचित!, जिल्हा परिषदेची बियाणे वितरण योजना
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: Five and a half thousand farmers deprived of benefits !, Zilla Parishads seed distribution scheme

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या बीटी बियाणे वितरण योजनेला दिरंगाईचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस घरात व बाजारात पोहचल्यानंतर सुद्धा अद्याप ५ हजार ८५१ शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी सदर योजनेसाठी ९००६ लाभार्थी निवडीचे लक्षांक ठेवले होते.

साडेपाच हजारांवर शेतकरी लाभापासून वंचित!, जिल्हा परिषदेची बियाणे वितरण योजना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या बीटी बियाणे वितरण योजनेला दिरंगाईचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस घरात व बाजारात पोहचल्यानंतर सुद्धा अद्याप ५ हजार ८५१ शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी सदर योजनेसाठी ९००६ लाभार्थी निवडीचे लक्षांक ठेवले होते.

त्यापैकी १७ डिसेंबरपर्यंत प्रत्यक्षात ४ हजार १६४ लाभार्थ्यांचेच प्रस्ताव लेखा विभागाला सादर करण्यात आले असून ३ हजार १५५ लाभार्थ्यांच्याच खात्यात ४० लाख २५ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे.


आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत २ कोटी ४ लाख २५ हजार रुपयांच्या योजना राबविण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर बीटी बियाणे वाटप करण्याच्या योजनेचा सुद्धा समावेश आहे. पावसाळा तोंडावर असतानाच सदर योजनेला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्याची प्रक्रिया रखडली होती.

त्यामुळे पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल अथवा नाही, यासंबंधी शंका व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान जून महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांना कपाशी बीजी-२ बीटी बियाणे लागवडीसाठी ९० टक्के अनुदानावर देण्याच्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत योजनेसाठी १ कोटी १८ लाख ४३ हजार रुपयांची भरिव तरतूद करण्यात आली.

त्यामुळे ९ हजार ६ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचे लक्ष सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने ठेवले होते. परंतु शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी करुन त्यांच्या घरात कापूस पोहचल्यानंतर सुद्धा पाच हजार ८५१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसल्याचे वास्तव आहे.


प्रस्तावात त्रृटी
योजनेसाठी काही लाभार्थ्यांनी त्रुटीपूर्ण प्रस्ताव सादर केल्याचे समोर आले आहे. काही लाभार्थ्यांनी देयकाची छायांकित प्रत जाेडली असून, क्षेत्रफळ कमी असतानाही (उदा. ०.९३ आर) दाेन बियाणे बॅगचे देयक जाेडले आहेत. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यास क्षेत्रफळानुसार बॅगचे अनुदान द्यावे लागणार आहे. दरम्यान योजनेसाठी अद्याप निवड झालेल्या ३ हजार १३४ शेतकऱ्यांनी अजूनही बिल दिले नसल्याची बाब समोर आला आहे.


अशी आहे स्थिती
- लाभार्थी लक्षांक - ९ हजार ६
- प्राप्त प्रस्ताव - ४ हजार ७६६
- पं.स. स्तरावर उपलब्ध - १ हजार १०६
- शेतकऱ्यांकडून बिल अप्राप्त प्रस्ताव - ३ हजार १३४
- लेखा विभागाला सादर प्रस्ताव - ४ हजार १६४
- लाभ दिलेले शेतकरी - ३ हजार १५५
- लाभाची जमा रक्कम - ४० लाख २५ हजार
- लाभापासून वंचित - ५ हजार ८५१

(संपादन - विवेक मेतकर)

loading image