शहरात निर्माण केली होती टोळीने दहशत, प्रमुखासह साथीदारांवर पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 13 October 2020

  टोळी प्रमुख अब्दुल राजीक उर्फ लल्ला व त्याच्या साथीदारांनी सर्वसामान्यांना मारहाण करून शहरासह परिसरात दहशत निर्माण केली होती.

वाशीम :  टोळी प्रमुख अब्दुल राजीक उर्फ लल्ला व त्याच्या साथीदारांनी सर्वसामान्यांना मारहाण करून शहरासह परिसरात दहशत निर्माण केली होती.

दरम्यान अशा अप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी वाशीम पोलिस दलाने या टोळी विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्याची परवानगी मागीतली होती. या मागणीला प्रतिसाद देत अपर पोलिस महानिरीक्षकांनी दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी दिल्याने वाशीमकरांनी सुटकेचा निश्वास घेतला.

पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, शहरातील पंचशिलनगरमध्ये वास्तव्यास असलेला टोळी प्रमुख अब्दुल राजीक उर्फ लल्ला अब्दुल माजीद व त्याचे साथीदार अ.साजिद उर्फ शाहरुख अ.माजीद, विनोद रविंद्र इंगळे, उमेश किशोर गायकवाड, संदीप रतन उफाडे या टोळीने शहरास परिसरात दहशत निर्माण केली होती.

या टोळी विरुध्द ३० एप्रिल २०२० रोजी भादंवि कलम ३९४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी टोळीप्रमुखासह सर्व आरोपींना ताब्यात घेतले असता चौकशी दरम्यान त्यांच्याविरुध्द यापूर्वी अशा प्रकारचे २९ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली.

यावरून सदर टोळी संघटीतपणे दहशत पसरविण्यासोबतच चोरी, घरफोडी, दरोडा, दरोड्या प्रयत्न, दंगा करणे, जीवे मारण्याची धमकी देवून लूटमार करणे या सारखे गुन्हे करीत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. या टोळीविरुध्द मकोका कायद्यानुसार कारवाईस परवानगी मागण्यात आली असता वरीष्ठ अधिकाऱ्यांनी तशी परवानगी दिली.

त्यामुळे या सराईत गुन्हेगारांविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१)(२२)३ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, अपर पोलिस अधीक्षक विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली. जिल्ह्यात अशा प्रकारची ही दुसरी कारवाई आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार असल्याने जिल्हावासींमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: The gang had created panic in the city, police action against the chief and his accomplices