शिक्षकांच्या चाचणी शिबिरात सुरक्षित अंतराचा नियम धाब्यावर!

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 20 November 2020

राज्य शासनाच्या निर्देशानुसार २३ नोव्हेंबरपासून इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या पूर्व तयारीचा भाग व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्या करण्यात येत आहेत.

अकोला   ः राज्य शासनाच्या निर्देशानुसार २३ नोव्हेंबरपासून इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या पूर्व तयारीचा भाग व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्या करण्यात येत आहेत.

या चाचण्यांना गुरुवार (ता. १९) पासून स्थानिक आयएमए सभागृह व भरतीया रुग्णालयात सुरूवात करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी कोरोना तपासणीसाठी एकच गर्दी केल्यामुळे कोरोनाच्या सुरक्षित नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. त्यासह तपासण्यांसदर्भात आरोग्य व शिक्षण विभागाचे कुनियोजन सुद्धा दिसून आले.

राज्यातील सरकारी अनुदानित तसेच खासगी व्यवस्थापनाच्या नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि त्याचे वर्ग २३ नोव्हेंबरला सुरू करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर १७ ते २२ नोव्हेंबरपर्यत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेशी संबंधित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

त्यासाठी जिल्ह्यात कोविड चाचण्या नमुने संकलनासाठी दहा केंद्र सुद्धा तत्पर ठेवण्यात आले आहे. त्यापैकी भरतीया रुग्णालय व आयएमए सभागृहात शिक्षकांसाठी कोरोना चाचणी केंद्र सज्ज ठेवण्यात आले आहेत. या दोन केंद्रांवर गुरुवार (ता. १९) पासून शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यास सुरूवात झाली आहे.

यावेळी तपासण्यांसाठी शिक्षकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे चाचणी दरम्यान कोरोनाला हरवण्यासाठी आवश्यक असलेला सुरक्षित अंतराच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. त्यासह शिक्षण व आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाचे सुद्धा तपासण्यांसंदर्भात नियोजन नसल्याचे दिसून आले.

 

५५० शाळा; सहा हचार कर्मचारी
जिल्ह्यातील इयत्ता ९वी, १०वी, ११वी व १२वी च्या शिक्षकांच्या चाचण्या करावयाच्या आहेत. जिल्ह्यातील अकोला तालुक्यात २२०, अकोट तालुक्यात ६७, बाळापूर तालुक्यात ५८, बार्शीटाकळी तालुक्यात ४५, मूर्तिजापूर तालुक्यात ५९, पातूर ५०, तेल्हारा ४७ व अकोला मनपाच्या चार अशा ५५० शाळा आहेत. त्यात ४००२ शिक्षक आहेत. हे शिक्षक इयत्ता ९वी ते १२वी या वर्गांना शिकवणारे आहेत, तसेच दोन हजार शिक्षकेतर कर्मचारी आहेत.

 

कोठे काय आढळले?
- कोरोना तपासणीसाठी शिक्षकांना आदेश मिळताच त्यांनी सकाळी १० वाजतापासूनच शहरातील भरतीया रुग्णालय व आयएमए सभागृहात गर्दी केली. शिक्षकांची संख्या अधिक व स्वॅब संकलन केंद्रांवर नियोजन नसल्याने कोरोना तपासणीदरम्यान शिक्षकांची गर्दी उसळल्याचे दिसून आले.
- महापालिका हद्दीतील शाळांमधील शिक्षकांच्या कोविड तपासण्या भरतीया रुग्णालय व अकोला तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या तपासण्या आयएमए सभागृहात करण्यात आल्या.
- यावेळी शिक्षकांना सूचना देण्यासाठी शिक्षण विभागाचा एकही अधिकारी पूर्णवेळ उपस्थित नसल्याचे दिसून आले. आयएमए सभागृहात शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रकाश मुकुंद यांनी येऊन केवळ पाहणी केली.
- आयएमए सभागृहासह भरतीया रुग्णालयात तपासणीसाठी पोहचलेल्या शिक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. यावेळी कोरोनाला हरवण्यासाठी आवश्यक असलेला सुरक्षित अंतराचा नियमा मात्र शिक्षकांनीच पायदळी तुडवल्याचे दिसून आले.
- कोरोना चाचणीसाठी महिला शिक्षकांच्या रांगा लागलेल्या असतानाच पुरूष शिक्षकांच्या रांगा सुद्धा महिल्यांच्या बाजूला लागल्याचे दिसून आले. त्यामुळे महिला शिक्षक व पुरष शिक्षकांचे सुरक्षित अंतर पाच फुटांपेक्षा सुद्धा कमी अंतरावर असल्याचे दिसून आले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Lack of planning in teachers covid test camp