esakal | आयुक्तांचा कर्मचाऱ्यांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’, कापल्या जाणार एक दिवसाचा पगार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Late 147 employees get one day salary cut

 महानगरपालिकेच्या सुस्तावलेल्या प्रशासकीय यंत्रणेचा नागरिकांना फटका बसत असल्याची ओरड सुरू सुरू असतानाच बुधवारी महापालिका आयुक्तांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयांची झाडाझडती घेत कारवाईचा ‘बॉम्ब’ टाकला. तब्बल १४७ लेट लतीफ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपातीचे आदेश आयुक्त संजय कापडणीस यांनी दिले.

आयुक्तांचा कर्मचाऱ्यांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’, कापल्या जाणार एक दिवसाचा पगार

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला :  महानगरपालिकेच्या सुस्तावलेल्या प्रशासकीय यंत्रणेचा नागरिकांना फटका बसत असल्याची ओरड सुरू सुरू असतानाच बुधवारी महापालिका आयुक्तांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयांची झाडाझडती घेत कारवाईचा ‘बॉम्ब’ टाकला. तब्बल १४७ लेट लतीफ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपातीचे आदेश आयुक्त संजय कापडणीस यांनी दिले.


कोरोना संकट काळात सर्वच प्रशासकीय यंत्रणा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी व्यस्त होत्या. यात महानगरपालिका कर्मचारीही आघाडीवर होते. मात्र आता कोरोनाच्या कामातून बाहेर पडत नागरिकांची दैनंदिन कामे वेळेत पूर्ण करण्याला प्रशासनाकडून प्राधान्य देणे आवश्यक झाले आहे. कोरोना संकट काळातील घसरलेली प्रशासकीय गाडी रुळावर आणणे आवश्यक आहे. गेले सहा महिने प्रशासनातील कर्मचारी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने सुस्तावल्याचा भास होत होता.

मनपाच्या मुख्यालयासह सर्व झोन कार्यालयात कर्मचारी कामाबाबत गांभिर्य राखत नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे प्रशासनात आलेला सुस्तावले पणा घालवण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी बुधवारी कर्मचाऱ्यांविरुद्ध ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला.

बुधवारी सकाळी १०.३० वाजता आयुक्‍त मनपा मुख्‍य कार्यालयातील विविध विभागांतर्गत झाडाझडती घेत फिरले. मनपाच्या पूर्व, पश्चिम, उत्‍तर आणि दक्षिण झोन कार्यालयात कार्यरत असलेल्‍या कर्मचाऱ्यांची उपस्थितीबाबत तपासणी केली. त्यात एक-दोन नव्हे तर तब्बल १४७ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. ही बाब कार्यालयीन कामकाजाच्‍या दृष्‍टीने शिस्‍तीस अनुसरून नसून कर्तव्‍यात कसूर करणारी आहे. त्यामुळे आयुक्तांनी वेतन कपातीचा बगडा अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर उगारला.


विभागनिहाय अनुपस्थिती
मनपाच्या कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत आहे. मनपा आयुक्तांनी बुधवारी सकाळी केलेल्या पाहणीत सामान्‍य प्रशासन विभागातील ९, बाजार परवाना विभागातील १४, माहिती अधिकार कक्ष ४, विद्युत विभागातील ७, अलेप, शिक्षण, पुर्वझोन आणि पश्चिम झोन कार्यालयातील प्रत्‍येकी ३, उत्‍तर झोन कार्यालयातील १४, दक्षिण झोन कार्यालयातील ५, आरोग्‍य (स्‍वच्‍छता) विभागातील १९, निवडणूक विभागातील १, संगणक विभागातील ६, भांडार विभागातील २, जन्‍म मृत्‍यू विभागातील ४, नगरसचिव विभागातील १५, जलप्रदाय विभागातील ११, कर वसुली विभागातील ६, नगररचना विभागातील १०, महिला व बाल कल्‍याण विभागातील १, लेखा विभागातील ७ असे एकूण 147 कर्मचारी अनुपस्थित आढळून आले. त्यामुळे त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्‍याचा आदेश आयुक्तांनी दिला.

कारवाईचा इशारा
मनपाच्या ढेपाळलेल्या कारभाराबाबत आयुक्त संजय कापडणीस यांनी गांभिर्याने कारवाई सुरू केली आहे. कार्यालयात उशिरा येणारे तसेच पुर्वपरवनगी न घेता गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्‍यात येणार असल्‍याचा इशारा त्यांनी दिला. मनपातील प्रत्‍येक कर्मचारी यांनी दैनंदिन केलेल्‍या कामांची नोंदवही (वर्क रजिस्‍टर) ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

संपादन - विवेक मेतकर