
काय झालं कुणास ठाऊक, अजूनपर्यंत तूर फुटलीच नाही! थंडी सुद्धा वाढली, आता दव पडलं तर, शेंग तर सोडा फुलही धरतील की नाही, याचा भरवसा नाही. यंदा पावसानं अख्खे मूग, उडीद, सोयाबीनचे पीक संपविले आता, तूरही रडवते वाटते भाऊ, शेतकऱ्यांची अशी चर्चा सध्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात ऐकायला मिळत आहे.
अकोला ः काय झालं कुणास ठाऊक, अजूनपर्यंत तूर फुटलीच नाही! थंडी सुद्धा वाढली, आता दव पडलं तर, शेंग तर सोडा फुलही धरतील की नाही, याचा भरवसा नाही. यंदा पावसानं अख्खे मूग, उडीद, सोयाबीनचे पीक संपविले आता, तूरही रडवते वाटते भाऊ, शेतकऱ्यांची अशी चर्चा सध्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात ऐकायला मिळत आहे.
गेल्या काही वर्षांत पावसाचा लहरीपणा, दुष्काळ, अवकाळी पाऊस, किडीचा प्रादुर्भाव, पिकांना तणाचा घेराव इत्यादी कारणांनी खरीप तसेच रब्बी हंगामातही शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाल्याचे जिल्ह्यात चित्र आहे.
यावर्षी सुद्धा मॉन्सूनचे आगमण उशिरा झाल्याने खरिपाची सुरुवात उशिराच झाली. त्यातही बहुतांश भागात पावसाचा लहरीपणा व अवकाळी पावसाने मूग, उडीद, ज्वारी व सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त केले. कापसाच्या पिकालाही मोठा फटका बसला असून, उत्पादन अपेक्षेच्या निम्म्यावरच येऊन ठेपले आहे.
खरिपातील तुरीच्या पिकावर मात्र अजूनही शेतकऱ्यांची भिस्त कायम होती. भरपूर पाऊस झाल्याने उशिरा येणाऱ्या या पिकाची स्थितीही उत्तम आहे. परंतु, अजूनपर्यंत तुरीचा फुलोर बहरला नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. पीक कालावधी व अवस्थेनुसार आतापर्यंत तूर फुटणे व शेंग धरणे गरेजेचे होते.
परंतु, बहुतांश भागात अशी स्थिती दिसून येत नाही. आता थंडी सुद्धा वाढली असून, दव पडायला सुरुवात झाली आहे. दव पडण्याचे प्रमाण व थंडीचे प्रमाण वाढल्यास तूर फुटणे किंवा शेंग धरण्याची क्षमता कमी होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे आतापर्यंत भरवश्याची वाटणारी तूर सुद्धा यंदा रडवते की काय, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
यावर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीनच्या पिकातून निराशा झाली. परंतु, तुरीचे पीक चांगले असल्याने या पिकातून दिलासाजनक उत्पादन मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अजूनपर्यंत तूर फुलटी नाही व थंडी आणि दवही वाढत आहे. याचा फटका तूर पिकाला व पर्ययाने उत्पादनाला बसू शकतो.
- सागर इंगोले, शेतकरी, सालतवाडा, तालुका मूर्तिजापूर
(संपादन - विवेक मेतकर)