महाबीजची आमसभा गाजणार ‘मोबाईल’वर; ऑनलाइन सभेच्या निर्णयावर भागधारकांचा आक्षेप

अनुप ताले 
Saturday, 19 December 2020

 कोविड १९ चे कारण पुढे करीत महाबीजची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा यंदा २२ डिसेंबर रोजी व्हिडिओ काँन्फरन्सिंगद्वारे घेण्याचा निर्णय महाबीज प्रशासनाने घेतला असून, तशा सूचना भागधारकांना दिल्या आहेत. परंतु, ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या असून, अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल सुद्धा उपलब्ध नाहीत.

अकोला : कोविड १९ चे कारण पुढे करीत महाबीजची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा यंदा २२ डिसेंबर रोजी व्हिडिओ काँन्फरन्सिंगद्वारे घेण्याचा निर्णय महाबीज प्रशासनाने घेतला असून, तशा सूचना भागधारकांना दिल्या आहेत. परंतु, ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या असून, अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल सुद्धा उपलब्ध नाहीत.

शिवाय दिवसभर चालणाऱ्या या सभेला मोबाईलच्या माध्यमातून कसे उपस्थित राहायचे व समस्या कशा मांडायच्या, असा प्रश्‍न उपस्थित करीत भागधारकांनी ऑनलाइन सभेच्या निर्णयावर आक्षेप नोंदविला आहे.

शेतकऱ्यांसाठी व शेतकऱ्यांच्या सहभागातून निर्मित महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ राज्यभरात एक कौतुकास्पद व शेतकऱ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ आहे. या माध्यमातून गुणवत्तापूर्ण, खात्रिचे बियाणे शेतकऱ्यांना अल्पदरात उपलब्ध होत असते. शेतकऱ्यांना कमी दरात बियाणे उपलब्ध करून देऊनही महाबीज सातत्याने नफ्यात राहणारे महामंडळ आहे ही विशेष बाब. यासाठी दरवर्षी होणारी भागधारकांची वार्षिक सर्वसाधारण सभा महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.

या सभेत नफातोटापत्रक, ताळेबंद यावर चर्चा करून अहवाल सादर केला जातो. बियाण्यांसंदर्भात, बियाणे उपलब्धतेसंदर्भात, बियाणे प्लांट मिळण्याबाबत, बियाणे पास/नापास प्रक्रियेबाबत, डिव्हिडंट मिळणे बाबत व इतरही विविध समस्यांची भागधारकांकडून मांडणी केली जाते व त्यावर निराकरण केले जाते. त्यासाठी राज्यभरातून भागधारक शेतकरी वार्षिक सर्वसाधारण सभेला प्रत्यक्ष उपस्थित असतात.

यावर्षी मात्र, कोविडचे कारण पुढे करीत महाबीज प्रशासनाने ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता व्हिडिओ काँफरन्सिंगद्वारे म्हणजे ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, अनेक शेतकऱ्यांकडे अँड्राइड मोबाईल नाहीत, अनेकांना अँड्राइड वापरण्याबाबत माहिती नाही, बहुतांश भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा समस्या आहे. शिवाय ही सभा दिवसभर चालते. त्यामुळे ही सभा दरवर्षीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने व भागधारक शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पाडावी, अशी मागणी भागधारक शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

मागील दहा वर्षापूर्वीच्या महाबीजच्या आमसभा माहे एप्रिल-मे मध्ये घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावर्षी सुद्धा कोविड वरील लस उपलब्ध झाल्यानंतर, भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत महाबीजच्या मुख्यालयात आमसभा घेण्यात यावी. अँड्रॉइड मोबाईलची उपलब्धता, इंटरनेट कनेक्टीव्हिटीची समस्या असल्याने शेतकरी या सभेला मुकले जाऊ शकतात. शेतकरी व भागधारकांचे अनेक ज्वलंत प्रश्‍न आहेत, जे फक्त प्रत्यक्ष आमसभेमध्ये घेतल्या जाऊ शकतात. हे प्रश्‍न निकाली काढणे हे अत्यंत गरजेचे असल्याने आमसभा ही ऑनलाइन न घेता महाबीजच्या मुख्यालयात ऑफलाइन घेण्यात यावी.
- गणेश कंडारकर, महाबीज भागधारक तथा डॉ.पं.दे.कृ.वि. कार्यकारी परिषद सदस्य

व्यवस्थापकीय संचालकांची प्रतीक्षाच
अनिल भंडारी यांची बदली झाल्यानंतर लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. परंतु, अजूनपर्यंत ते रुजू झाले नसल्यामुळे, आमसभेपर्यंत ते रुजू होणार की नाहीत, आमसभेत शेतकऱ्यांनी प्रश्‍न कोणासमोर मांडायचे, असे विविध प्रश्‍न भागधारकांकडून उपस्थित केले जात आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Mahabeej public meeting to be held on mobile; Stakeholders object to the decision of the online meeting