esakal | पैशाच्या वादातून भंगार व्यावसायिकाचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Money dispute with scrap dealer

तालुक्यातील कोळासा येथे एका भंगार व्यवसायीकाचा पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (ता. ९) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

पैशाच्या वादातून भंगार व्यावसायिकाचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

बाळापूर,(जि.अकोला) : तालुक्यातील कोळासा येथे एका भंगार व्यवसायीकाचा पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (ता. ९) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या पाच तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. बाळापूर पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या ग्राम कोळासा येथे ही घटना घडली असून रामकिशोर सुरजप्रसाद राजपूत (वय ३५, रा. कोळासा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

रामकिशोर राजपूत हा कोळासा येथील ताराबाई तुरबशा यांच्याकडे राहतो. त्याचा गावातच भंगार खरेदी करण्याचा व्यवसाय आहे. रामकिशोर याने गावातीलच आरोपी राहुल मोहन गवारगुरु (वय ३०) याच्याकडून भंगार खरेदी केले होते.

मात्र रामकिशोर हा भंगाराचे पैसे देत नसल्याने त्यांच्यात वाद होत होते. सोमवारी (ता. ९) रात्री याच कारणावरून दोघांमध्ये वाद उफाळून आला. वादाचे रूपांतर हाणामारीत होत आरोपी राहुल गवारगुरू याने रामकिशोर राजपूत याच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले.

त्यामुळे रामकिशन याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी हा घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिस ठाण्याचे नितीन शिंदे व त्यांचा पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला. ताराबाई तुरबशा यांच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पसार झालेल्या आरोपीला पाच तासांत अटक
डोक्यावर कुऱ्हाडीचे घाव बसताच रामकिशोर हा जागेवरच कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याचे समजताच आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. ठाणेदार नितीन शिंदे यांनी तपासचक्रे फिरवत फरार आरोपी राहुल गवारगुरु याचा शोध घेतला. ठाणेदार नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस कॉन्स्टेबल अनंत सुरवाडे, पोलिस हवालदार गणेश जंजाळ, पोलिस कॉन्स्टेबल राजू नागरे व पोलिस कर्मचाऱ्यांनी खामगाव तालुक्यातील संभापूर येथून आरोपीला अटक करण्यात आली.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top