
दैनंदिन आहारात वापरल्या जाणाऱ्या पालेभाज्या विषमुक्त मिळाव्यात, यासाठी परसबागेच्या माध्यमातून घरच्या घरी सेंद्रिय भाजीपाला पिकवण्यासाठी, जाणीव जागृती होण्याच्या दृष्टिने जागर फाउंडेशनने ‘माझी परसबाग’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेबाबत उद्या (ता.१३) मार्गदर्शक कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे.
अकोला : दैनंदिन आहारात वापरल्या जाणाऱ्या पालेभाज्या विषमुक्त मिळाव्यात, यासाठी परसबागेच्या माध्यमातून घरच्या घरी सेंद्रिय भाजीपाला पिकवण्यासाठी, जाणीव जागृती होण्याच्या दृष्टिने जागर फाउंडेशनने ‘माझी परसबाग’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेबाबत उद्या (ता.१३) मार्गदर्शक कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेत अकोला शहर व लगतच्या पाच किमी परिसरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरात दररोज एक ते दिड किलो कचरा निघतो. हा कचरा बाहेर न फेकता त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर करून त्यापासून सकस भाजीपाल्याचे उत्पादन होऊ शकते. घराच्या अंगणात, गच्चीवर ही बाग फुलविण्यात अनेकांनी यश मिळवून त्यांच्या कुटुंबाच्या आहाराला विषमुक्त केले आहे. मात्र हे प्रयोग ठराविकच कुटुंबांमध्ये राबविल्या जातात. याचा प्रसार प्रचार घरोघरी होण्याच्या दृष्टिने सामाजिक जागृती होण्यासाठी ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजीत केली आहे.
विजेत्या स्पर्धकांना एकूण २० हजार रुपयांची पारितोषिके भेट देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करून २५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत परसबागेची निर्मिती करावयाची आहे. जागर फाउंडेशनने यापूर्वी निराधारांची दिवाळी, स्वच्छता दिवाळी, पूरग्रस्तांना परिवारांना बैल वाटप, जल साक्षरता, माझी वारी - स्वच्छ वारी अशा अनेक उपक्रमांद्वारे सामाजिक जाणीवांचा जागर सुरू ठेवला आहे. माझी परसबाग स्पर्धेतही अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
कार्यशाळेत मिळतील ‘या’ प्रश्नांची उत्तरे!
गच्चीवर परसबाग फुलवल्यास छत गळेल का, रोगराई पासून झाडांचे संरक्षण कसे करायचे, सेंद्रिय खत निर्मिती कशी करायची, पाणी कसे व किती द्यायचे, याची उत्तरं अनेकांना माहिती नसतात. अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १३ डिसेंबर २०२० रोजी हनुमान मंदिर सभागृह, गुरूपुष्प नगर, कोठारी वाटीका नं. ३ जवळ, मलकापूर ग्राम पंचायतच्या मागे, अकोला येथे दुपारी १२ वाजता ही कार्यशाळा होणार असून, इच्छिुकांनी अनंत देशमुख, किशोर कुकडे यांचेशी संपर्क साधावा, असे सूचविण्यात आले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)