
ज्येष्ठ रंगकर्मी, अकोला भूषण राममामा जाधव यांचे सोमवारी, ता. ३० नोव्हेंबर रोजी दीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने नाट्य क्षेत्राचा चालता, बोलता विश्वकोष हरविला आहे. मागील पाच दशकापासून अकोल्याची नाट्य चळवळ प्रभावित ठेवणाऱ्या या जातीवंत कलावंताने जीवनाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली आहे. मृत्यसमयी मामांचे वय ८७ वर्ष होते.
अकोला : ज्येष्ठ रंगकर्मी, अकोला भूषण राममामा जाधव यांचे सोमवारी, ता. ३० नोव्हेंबर रोजी दीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने नाट्य क्षेत्राचा चालता, बोलता विश्वकोष हरविला आहे. मागील पाच दशकापासून अकोल्याची नाट्य चळवळ प्रभावित ठेवणाऱ्या या जातीवंत कलावंताने जीवनाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली आहे. मृत्यसमयी मामांचे वय ८७ वर्ष होते.
अगदी लहानपणापासूनच राम जाधव यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. लहान -मोठ्या भूमिका साकारत त्यांनी आपली चुणूक दाखविली. पुढे महाविद्यालयीन जीवनात देखील त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. नंतरच्या काळात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच रंगभूमीच्या चरणी बहाल केले.
रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टरची नोकरी करीत असताना दुसरीकडे रंगभूमीवर मामांची भूमिका वठविणे सुरूच होते. प्रयोगिक रंगभूमीला सन्मान मिळवून देण्याचे काम मामांनी केले. रंगभूमीला व्यवसाय न मानता पूजा मानणारे मामा होते.
मामांनी अभिनया सोबतच, दिग्दर्शन, निर्माता म्हणून देखील आपली छाप पाडली. मामांच्या कार्याची दखत घेत राज्यशासनासह विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले. सन २०११ मध्ये रत्नागिरी येथे भरलेल्या ९१ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद राम जाधव यांनी भूषविले.
हा अकोलेकरांसाठी फार मोठा सन्मान होता. त्यांच्या जाण्याने अकोल्यातील सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शब्दसुमणांजली वाहली आहे.
दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
रासिकाश्रय नाट्य संस्था अकोल्याचे संस्थापक राममामा जाधव यांचे आज सकाळी ८.३० वाजता नवी दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये निधन झाले. दोन महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांचे धाकटे चिरंजीव आतरिक्त पोलिस महासंचालक हरियाणा सरकार श्रीकांत जाधव (भापोसे) यांचेकडे ते राहत होते. ज्येष्ठ चिरंजीव आतरिक्त प्रधान मुख्य संरक्षक मध्यप्रदेश प्रशांत जाधव या दोघांनी त्यांचे उपचारार्थ प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
मराठी नाट्य सृष्टीतील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ रंगकर्मी राममामा जाधव यांना श्रद्धांजली
मुंबई : मराठी नाट्य सृष्टीच्या वाढीसाठी, चांगल्या बदलांसाठी ध्यास घेतलेला मार्गदर्शक हरपला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी राममामा जाधव यांना अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ रंगकर्मी, रत्नागिरीच्या ९१ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष राममामा जाधव यांनी आपले संपूर्ण जीवनच रंगभुमिला समर्पित केले होते. कला क्षेत्रात विविध स्तरावर काम करताना त्यांनी नाट्य चळवळ सामान्य माणसांपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न केले. नाट्य सृष्टीचा विकास व्हावा, तिच्यामध्ये चांगले बदल घडावेत यासाठी प्रयोग देखील केले. अकोल्यातील नाट्य चळवळ, तिचा विकास हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते. विदर्भातील नाट्यसृष्टीला उभारी देण्यात देखील ते पुढे होते. त्यांच्या निधनामुळे मराठी नाट्यसृष्टीच्या बदलासाठी ध्यास घेतलेला ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी राममामा जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
(संपादन - विवेक मेतकर)