पार्किंग व्यवस्थेचे तीनतेरा; चौक झाले वाहनतळ

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 12 December 2020

वाकाटकाची राजधानी व बाळासाहेबांची नगरी अशी ओळख असलेल्या वाशीम शहरात सर्वसामान्य माणसाला रस्त्याने चालणेही मुश्किल झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. शहरातील मुख्य चौक वाहनतळ झाले असून, स्थानिक पालिका प्रशासनाने पुन्हा खासगी पार्किंग व्यवस्था लागू करावी अशी मागणी होत आहे.
 

वाशीम : वाकाटकाची राजधानी व बाळासाहेबांची नगरी अशी ओळख असलेल्या वाशीम शहरात सर्वसामान्य माणसाला रस्त्याने चालणेही मुश्किल झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. शहरातील मुख्य चौक वाहनतळ झाले असून, स्थानिक पालिका प्रशासनाने पुन्हा खासगी पार्किंग व्यवस्था लागू करावी अशी मागणी होत आहे.

तीन वर्षापूर्वी शहरामधे खासगी पार्कींगचे कंत्राट देण्यात आले होते. यामुळे व्यापारी प्रतिष्ठानासमोर दुचाक्या रेषेत लागत होत्या. चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.

मात्र, दंडाच्या रकमेवरून वाद होवून येथील व्यापाऱ्यांनी बंदचे हत्यार उपसले होते. परिणामी शहरातील वाहतुकीला शिस्त लावणारी पार्किंग व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांकडून बंद करण्यात आली होती.

वर्षभर रेषेत वाहने लावण्यात येत असली तरी गेल्या वर्षभरापासून शहरातील मुख्य वर्दळीचे चौक वाहनतळ झाले आहेत. परिणामी नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. चौकामध्ये वाहनधारक मन मानेल तशी वाहने उभी करीत असल्याने वाहतूक तुंबून प्रचंड कोंडी दररोजचीच बाब झाली आहे.

खासगी पार्किंगशिवाय पर्याय नाही
चौकामधे शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुकीचे नियमन करण्यात येते मात्र, वाहने रस्त्यावर त्यापुढे फेरीवाले व अवजड वाहनांच्या रांगा त्यामुळे आवागमन करण्यासाठी रस्ताच उरला नाही. शहर वाहतूक शाखेकडे कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने पालिका प्रशासनाने खासगी पार्किंग व्यवस्था लागू करावी अशी मागणी केली जात आहे.

पार्किंगचे दर परवडणारे असावे
तीन वर्षापूर्वी खासगी पार्किंगचे दर शंभर रूपये प्रति वाहन होते. पार्किंग रेषेबाहेर वाहन आढळून आल्यास शंभर रूपये भरावे लागत होते. पालिका प्रशासनाने आता खासगी पार्किंग सुरू करावी. परंतु, दर पडवडणारे असावे अशी मागणी होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Parking system thirteen; The square became a parking lot