esakal | महाबीज मुख्यालयात पोलिस बंदोबस्त; भागधारक संतापले, ऑनलाइन सभा आधीच गाजली ऑफलाइन
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Police security at Mahabeej headquarters; Stakeholders angry, online meetings already raging offline

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजची मंगळवारी (ता.२२) आयोजित केलेल्या ऑनलाईन सभा आधी ‘ऑफलाइन’ गाजली. सकाळीच काही भागधारक मुख्यालयात जाण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना अडविले.

महाबीज मुख्यालयात पोलिस बंदोबस्त; भागधारक संतापले, ऑनलाइन सभा आधीच गाजली ऑफलाइन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजची मंगळवारी (ता.२२) आयोजित केलेल्या ऑनलाईन सभा आधी ‘ऑफलाइन’ गाजली. सकाळीच काही भागधारक मुख्यालयात जाण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना अडविले.

यामुळे मुख्यालयासमोर प्रशासनाविरोधात एकच रोष व्यक्त करीत काही काळ ठिय्या दिला. महाबीज प्रशासनाला भागधारकांच्या रोषाला बळी पडावे लागणार असल्याची आधीच कुणकुण लागल्याने दंगाकाबू पथकासह तगडा बंदोबस्त मुख्यालयात लावण्यात आला होता.

महाबीजची सर्वसाधारण सभा कोरोनामुळे यंदा आॅनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या सभेत सहभागी होण्यासाठी भागधारकांना लिंक देण्यात आली होती. एक वाजता ही सभा नियोजित होती.

तत्पुर्वी काही भागधारक या ठिकाणी जमा झाले. त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु महाबीज प्रशासनाने या ठिकाणी दोन्ही गेटवर पोलिसांसह दंगाकाबू पथक तैनात केले होते. हा बंदोबस्त पाहून भागधारकांनी तीव्र शब्दात महाबीजविरुद्ध माध्यम प्रतिनिधींजवळ प्रतिक्रीया व्यक्त केल्या.


कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष
सातवा वेतन आयोग व इतर मागण्यांवरून महाबीजचे कर्मचारी संपावर गेलेले आहेत. आंदोलन सुरू होऊन बरेच दिवस लोटले. परंतु त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला, तोडगा काढायला कुणीही पुढे आलेले नाही. नफ्यात असलेल्या या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी शासनाच्या एक रुपयाचीही गरज नसताना वेतन आयोग लागू करण्यास टाळाटाळ करण्यात आलेली आहे. याविरुद्ध कर्मचारी संपावर आहेत. मंगळवारी सर्वसाधारण सभा असताना कर्मचारी मुख्यालयासमोर आपल्या मागण्या सुटतील या अपेक्षेने थांबलेले होते. कुणीही लक्ष देत नसल्याने या आंदोलनाचा तोडगा कधी व कसा निघेल याबाबत कर्मचारीही साशंक आहेत.


सभेची केवळ औपचारिकता
महाबीजची मंगळवारी झालेली सर्वसाधारण सभा औपचारिक ठरली. यामध्ये प्रभारी व्यवस्थापकीय संचालक वगळता कुठलाही वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाला नव्हता. भागधारकांचे प्रश्‍न तितक्या तळमळीने मांडण्यास वाव नव्हता. किती मुद्यांवर गांभिर्याने दखल घेतली जाईल याबाबत साशंकता आहे. दरवर्षी होणाऱ्या सभेत घमासान चर्चा होते. भागधारकांच्या प्रश्‍नांवर सकारात्मक तोडगा काढल्या जात असतो. यंदाची ही सभा केवळ औपचारिकता म्हणून घेण्यात आल्याचे एका ज्येष्ठ भागधारकाचे म्हणणे होते.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image