esakal | पाऊस उठला जीवावर, आईसह 3 मुले गंभीर जखमी, दोन शेतकरी भाजले तर वाशीममध्ये दोन वीज पडून  ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Rain kills 3 children, mother seriously injured, two farmers burnt, two killed in Washim

परतीच्या पावसाने खरिपाच्या पिकांना कारंजा तालुक्यात मोठा फटका बसला असतानाच, रविवारी (ता.११) वीजेच्या कडकडाटा सह कोसळलेल्या पावसामुळे शेतात काम करीत असलेल्या दोघांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे्.

पाऊस उठला जीवावर, आईसह 3 मुले गंभीर जखमी, दोन शेतकरी भाजले तर वाशीममध्ये दोन वीज पडून  ठार

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला :  यावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर तब्बल दीड महिना उशिराने जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मधल्या काळात खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र पावसाने कमी दिवसांत सरासरी भरुन काढली. दरम्यान आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची कापणी करुन ठेवली आहे. परंतु रविवारी (ता. ११) दुपारनंतर जिल्ह्यात सर्वत्र अचानक पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांनी शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासह पांढरे सोने सुद्धा पावसात ओले झाल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे.

कारंजा- वीज कोसळल्याने दोघे जणांचा मृत्यू
 परतीच्या पावसाने खरिपाच्या पिकांना कारंजा तालुक्यात मोठा फटका बसला असतानाच, रविवारी (ता.११) वीजेच्या कडकडाटा सह कोसळलेल्या पावसामुळे शेतात काम करीत असलेल्या दोघांचा वीज कोसळून मृत्यू तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली.
कारंजा शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हलका, मध्यम व जोराचा पाऊस पडत आहे. काही दिवस सोडले तर, आजतागायत पावसाची सतत रिपरिप सुरू राहिली.

अगोदरच कोरोनाचा कहर त्यात आस्मानी संकट यामुळे, शेतकरी पुरता होरपळून निघाला आहे. तालुक्यात रविवारी दुपारच्या सुमारास पावसाने मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली. तब्बल दोन तास सलग कोसळलेल्या या पावसामुळे खरिप पिकांचा हाती आलेला माल निघून जाऊ नये याकरिता ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग पावसात सुद्धा राबत होते.

त्याचा प्रत्यय म्हणून ग्राम पिंपळगाव गुंजाटे येथील शेतकरी नानासाहेब टोंग हे शेतातील सोयाबीनची गंजी झाकण्यासाठी गेले असताना अचानक वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला तर, दुसऱ्या घटनेमध्ये वडिलांसोबत शेतात काम करीत असलेल्या ग्राम नारेगाव येथील धीरज धोरक नामक १५ वर्षीय बालकाचा सुद्धा वीज कोसळून मृत्यू झाला. शिवाय त्याचे वडील सुद्धा गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त आहे. या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कारंजा तालुक्यातील दोन जण मृत्यूमुखी पडल्याने या दोन्ही गावांवर शोककळा पसरली असून, निसर्गाच्या या कहराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे व चिंतेचे ढग गडद झाले आहेत.

पिंजर- वीज पडल्याचे आईसह तिन मुलं जखमी
 वादळ, वाऱ्यासह पाऊस सुरू असताना लोखंडाच्या बाजीवर बसलेल्या आईसह तीन मुलांवर विज कोसळण्याची घटना रविवारी (ता. ११) दोनद खु. जवळील एका शेतात घडली. विज पडल्याने सर्वच जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जखमीमध्ये संध्या सदाशिव दडस (वय ४५), मुलगी सिमा सदाशिव दडस (वय १८), मुलगी सपना सदाशिव दडस ( वय १९), मुलगा प्रवीण सदाशिव दडस (वय २१, सर्व राहणार, मलकापूर माना) यांचा समावेश आहे. संबंधित सर्व पिंजर-अकोला रोडवर गजानन पाटील यांच्या शेतात परिवारासह शेळी, मेंढी घेऊन राहतात.

मूर्तिजापूर - वीज पडून दोन शेतकरी भाजले
तालुक्यातील खांदला येथील दोन शेतकरी रविवारी (ता. ११) दुपारी वीज पडल्याने भाजून जखमी झाले. विजय दशरथ पिंपळे (वय ४७) व सुनील आधार मोहिते (वय २५) हे दोघे शेतातील सोयाबीन पीक कापणीला आले का याची पहाणी करण्यासाठी शेतात गेले होते. अचानक वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. या दोन शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडून ते भाजल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना अकोल्याला पाठविण्यात आले.