esakal | हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Return rains hit soybean, cotton and orchards

परतीच्या पावसाने रविवारी (ता. ११) जिल्ह्याला झोडपले. काही गावांमध्ये दुपारपासून सायंकाळपर्यंत पाऊस कोसळला. त्यामुळे गावोगावी शेतीचे नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  : परतीच्या पावसाने रविवारी (ता. ११) जिल्ह्याला झोडपले. काही गावांमध्ये दुपारपासून सायंकाळपर्यंत पाऊस कोसळला. त्यामुळे गावोगावी शेतीचे नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

शेतकऱ्यांच्या हातचे सोयाबीन जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासह पांढरे सोने सुद्धा पावसात ओले झाल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. फळबागांचे सुद्धा नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.


यावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर तब्बल दीड महिना उशिराने जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मधल्या काळात खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र पावसाने कमी दिवसांत सरासरी भरुन काढली. दरम्यान आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची शेतात कापणी करुन ठेवली आहे.

त्यातच रविवारी (ता. १२) दुपारनंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन ओले झाले. काही शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले सोयाबीन ओले झाल्यामुळे आता सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसामुळे कापूस ओलाचिंब झाला असून काही ठिकाणी ओला कापूस जमिनीवर पडल्याचे दिसून आले. पावसामुळे ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली. आता उत्पन्न अल्प हाेणार असल्याने कर्ज कसे फेडावे, वर्षभर संसाराचा गाडा कसा हाकावा, पावसामुळे खरडून गेलेली जमीन व्यवस्थित करुन पुढील मशागतीसाठी पैसा काेठून आणावा, असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमाेर आ वासून उभे आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने भरीव मदत देण्याची मागणी हाेत आहे.

संत्रा पिकाचे नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
बोर्डी:  अकोट तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. नकदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन पावसामुळे मातीमोल झाले आहे. संत्रा पिकाचे सुद्धा अतोनात नुकसान झाले आहे. कपाशीचे पीक सुद्धा पावसामुळे मातीत जाते की काय अशी अवस्था आहे.


कपाशीच्या वेचनी परिसरात चालू असताना आलेल्या मुसळधार पावसाने शेतातीर कापूस ओला झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली दैना उडाली. कपाशीला एकरी खर्च निंदन, खत, फवारणी, डवरणी असा एकराला किमान साधारण विस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो. परंतु आता शेतकऱ्यांच्या हाता तोडांसी आलेला घास सुद्धा निर्सग हिसकावून घेत असल्याचे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

बोर्डीसह कासोद, शिवपूर, रामापूर, सुकळी, लाडेगाव, राहणापूर, अकोलखेड, अकोली जहागिर या भागात परतीच्या पावसामुळे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कपासीचे पीक हातातून जाते की काय अशी भीती शेतऱ्यांना वाटू लागली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)