सावधान! धोका पुन्हा वाढतोय, रुग्ण संख्येत सतत वाढ

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 21 November 2020

गत महिन्यात अचानक गती मंदावलेला कोरोनाचा संसर्ग दिवाळी संपताच वाढत असल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत २० ते २५ पॉझिटिव्ह रुग्ण संख्येच्या आता असलेली कोरोनाग्रस्तांची संख्या आता अचानक वाढत आहे.

सावधान! धोका पुन्हा वाढतोय, रुग्ण संख्येत सतत वाढ

अकोला  ः गत महिन्यात अचानक गती मंदावलेला कोरोनाचा संसर्ग दिवाळी संपताच वाढत असल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत २० ते २५ पॉझिटिव्ह रुग्ण संख्येच्या आता असलेली कोरोनाग्रस्तांची संख्या आता अचानक वाढत आहे.

त्यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान रुग्णवाढीचा वेग वाढल्यास कोरोनाच्या दुसरी लाटीसंदर्भात करायच्या उपाययोजनांची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू झाली आहे.

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने जिल्ह्यात मार्च महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीच्या काळात महानगरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नंतर गाव खेड्यात सुद्धा प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येने उच्चांकी गाठली होती. या महिन्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन हजारावर पोहचली होती.

त्यासह ॲक्टिव्ह रुग्ण सुद्धा एक हजारांवर गेले होते. मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा ६० वर जावून पोहचली होती. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा जिल्ह्यात गुणाकार सुरू असल्याचे दिसून आले होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात मात्र कोरोनाग्रस्तांच्या संख्या सतत कमी होत असल्याचे दिसून आले.

ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण १३ ऑक्टोबररोजी आढळले. यादिवशी ३३ रुग्णांची नोंद झाली होती. सप्टेंबरमध्ये मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या प्रतिदिवशी शंभरावर जावून पोहचली होती. मृत्यूचा दर सुद्धा सप्टेंबर महिन्यासह इतर महिन्यात तुलनेत सर्वाधिक होता. सप्टेंबरमध्ये ६० रुग्णांपेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

दरम्यान ऑक्टोबर पासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत कोरोनाचा वेग मंदावला होता. त्यामुळे कोरोनाग्रस्त आढळण्याची संख्या कमी होती. परंतु आता दिवाळी संपताच कोरोनाचा वेग वाढत आहे.

दिवाळी संपताच रुग्णांच्या संख्येत वाढ
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कोरोना ग्रस्त कमी आढळत होते. परंतु नंतरच्या काळात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. १३ नोव्हेंबर रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या २५ होती, १४ रोजी २३, १६ नोव्हेंबरला २६, १७ नोव्हेंबरला २०, १८ नोव्हेंबरला ३०, १९ नोव्हेंबरला ३० व २० नोव्हेंबरला कोरोनाचे ३२ रुग्ण आढळले आहेत. तर या पूर्वी नोव्हेंबर महिन्यात २२ रुग्णांपेक्षा कमीच रुग्ण आढळत होते.

मृत्यूदर तीन टक्क्यांवरच
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी करण्याचे आवाहन आरोग्य विभागासमोर कायम आहे. सध्या कोरोनाचा मृत्यूदर ३.३ टक्के आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उपाययोजना मृत्यूदर कमी करण्यासाठी अपूऱ्या असल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यात २० दिवासंत ७ रुग्णांचा मृत्यू झाला. नोव्हेंबरच्या १६ ते १९ तारखेदरम्यान प्रत्येक दिवसी एका रुग्णाचा बळी गेला.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: The risk of corona is increasing again, the number of patients is constantly increasing