‘कोरोना’चा बाजार ‘गरम’!, नागरिकांच्या गर्दीत नियमांची पायमल्ली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

दिवाळीच्या निमित्ताने अकोला शहरासह तालुका मुख्यालयातील बाजारांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. कोरोना संकटातून अद्याप जिल्हा पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. 

अकोला : दिवाळीच्या निमित्ताने अकोला शहरासह तालुका मुख्यालयातील बाजारांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. कोरोना संकटातून अद्याप जिल्हा पूर्णपणे बाहेर पडलेला नाही.

 आजही अनेक रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. अशा परिस्थितीत दिवाळी बाजारामध्ये नागरिकांकडून कोणतीही काळाजी घेतली जात नसल्याने ‘कोरोना’चाही बाजार गरम होताना दिसूत असून, संसर्गाचा धोका वाढतो आहे.

अकोला जिल्हा कोरोना विषाणू संसर्गाबाबत राज्यात हॉट ठरला होता. जिल्ह्यात मंगळवार, ता. १० नोव्हेंबरपर्यंत ८५८५ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. कोरोना संसर्गामुळे २८३ रुग्णांना प्राणास मुकावे लागले. अद्यापही जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये २२२ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना संसर्गाचा धोका अद्यापही जिल्ह्यात कायम आहे. 

अशा परिस्थितीत दिवाळी बाजारात होणारी गर्दी संसर्गाचा दुसरा उद्रेकास कारणीभूत ठरू शकते, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. बाजारात वावरतांना कोणत्याही नियमांचे पालन न करता नागरिक बाजारात बिनधास्तपणे खरेदी करताना दिसून येत आहे.

नागरिकांसोबत व्यावसायिकही निष्काळजी
कोरोना संसर्गामुळे तीन ते चार महिने बाजार बंद होते. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व व्यावसाय लॉकडाउनच्या काळात बंद ठेवण्यात आले होते. हळूहळू अनलॉक झाल्यानंतर सर्वच व्यवसायांना परवानगी मिळाली. नियमांचे पालन करून व्यवसाय करता येणार असला तरी दिवाळीच्या निमित्ताने व्यसायात होणारी वाढ लक्षात घेवून नागरिकांसोबतच व्यावसायिकही निष्काळजीपणे वागताना दिसत आहेत. कुठेही मास्कचा वापर होत नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे.

प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष
कोरोना संकट काळातील अनुभव बघता महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना व व्यावसायिकांना दिवाळी निमित्ताने बाजारात खरेदीला जादाना गर्दी न करण्याचे व गर्दी न होऊ देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याकडे बहुतांश व्यावसायिकांनी दुर्लक्ष केले असून, सर्वच दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या गर्दीत अनेकांनी मास्कचा वापरच केलेला दिसत नाही.

निर्जंतुकिकरणही नाही
कोरोना विषाणू कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी निर्जंतुकिकरण करण्यासंदर्भात प्रशासनाकडून आदेश देण्यात आले आहे. मात्र व्यावसायिकांकडून त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे बघावयास मिळत आहे. त्यामुळे येणऱ्या काळात अकोला जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठयाप्रमाणावर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

(संपादन - विवेक मेतकर) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Rules violated in Diwali Bazaar crowd of citizens; Increased risk of corona infection