
खबरदारी घेत शाळा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. परिणामी सोमवार (ता. २३) पासून जिल्ह्यातील शाळांची घंटी वाजण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अकोला ः जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्राकरीता इयत्ता ९वी ते १२वीचे सर्व शासकीय खासगी शाळांचे वर्ग, वसतीगृह, आश्रमशाळा विशेषतः आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतीगृह सोमवार (ता. २३) पासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी (ता. २२) दिले आहेत. पाल्याला शाळेत पाठवण्यापूर्वी पालकांची लेखी संमत्ती घेवून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात याव्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास किती पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्यातील सरकारी अनुदानित तसेच खासगी व्यवस्थापनाच्या नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि त्याचे वर्ग २३ नोव्हेंबरला सुरू करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेशी संबंधित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचण्या करण्याची प्रक्रिया गुरुवार (ता. १९) पासून जिल्ह्यात सुरू आहे. सदर चाचण्यांमध्ये काही शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सुद्धा वाढत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे शाळा सुरू करण्यासंदर्भात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. राज्य शासनाचे आदेश व स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये गोंधळ उडाला होता. दरम्यान शाळा सुरू करण्याच्या सर्व चर्चांना जिल्हाधिकारी पापळकर यांनी आदेश जारी करुन पूर्ण विराम लावला आहे.
त्याअंतर्गत खबरदारी घेत शाळा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. परिणामी सोमवार (ता. २३) पासून जिल्ह्यातील शाळांची घंटी वाजण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
५५० शाळा; सहा हजार कर्मचारी
जिल्ह्यात इयत्ता ९वी, १०वी, ११वी व १२वी च्या ५५० शाळा आहेत. अकोला तालुक्यात २२०, अकोट तालुक्यात ६७, बाळापूर तालुक्यात ५८, बार्शीटाकळी तालुक्यात ४५, मूर्तिजापूर तालुक्यात ५९, पातूर ५०, तेल्हारा ४७ व अकोला मनपाच्या चार अशा ५५० शाळा आहेत. त्यात ४००२ शिक्षक अध्यापनाचे काम करतात. सदर शिक्षक इयत्ता ९वी ते १२वी या वर्गांना शिकवणारे आहेत, तसेच दोन हजार शिक्षकेतर कर्मचारी आहेत.
सुरक्षाविषयक उपाययोजना करणे बंधणकारक
- विद्यार्थ्यांना शाळेत हात धुण्यासाठी सुविधा, थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सीमिटर, जंतूनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे लागेल. एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
- वर्गखोली तसेच स्टाफ रूम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था शाळांना करावी लागेल.
पालकांची लेखी संमती आवश्यक
विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असेल. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी वरील विषयी चर्चा करावी. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहुन देखील अभ्यास करता येईल. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मूल्यांकनाकरिता विशिष्ठ योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी तयार करण्यात यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)