esakal | ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ उपक्रम ठरतोय दिलासादायक
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: Schools closed, education resumes

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणाच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेचे विद्यार्थी मागे राहू नयेत, यासाठी शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे ४ तरूणांनी पुढे येत शाळा बंद शिक्षण सुरू हा उपक्रम सुरू केला आहे.

‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ उपक्रम ठरतोय दिलासादायक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

खामगाव (जि.बुलडाणा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणाच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेचे विद्यार्थी मागे राहू नयेत, यासाठी शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे ४ तरूणांनी पुढे येत शाळा बंद शिक्षण सुरू हा उपक्रम सुरू केला आहे.


कोरोनामुळे बदललेल्या लाईफस्टाईलचा फटका शिक्षण क्षेत्रालाही बसला आहे. शाळा बंद असल्याने अभ्यासक्रम अपूर्ण राहू नये, यासाठी विविध शाळांकडून ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्यात येत आहेत. यात मुख्यत्वे करून खासगी शाळा आघाडीवर आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना त्या मानाने ही सुविधा मिळताना दिसत नाही. यात सर्वात मोठी अडचण आहे, ती अँड्रॉईड मोबाईलची.

अनेकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने जिथे खायचेच वांदे आहेत, तिथे महागडा मोबाईल आणायचा तरी कोठून, असा प्रश्न गरीब पालकांसमोर आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होवू नये, यासाठी पहुरजिरा येथील ज्ञानेश्वर मधूकर घोपे, आकाश खंडारे, योगेंद्र पहूरकर, रूपेश पहुरकर हे तरूण पुढे आले.

त्यांनी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या धर्तीवर पहुरजिरा येथे 'शाळा बंद शिक्षण सुरू' उपक्रम सुरू केला. दिवसभरात ३ बॅचच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेत आहेत. विशेष म्हणजे कोरोना आजाराच्या पार्श्वभुमिवर शासनाच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे.

या उपक्रमासाठी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या आवाहनाला सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण पारस्कार, संजय फाटे, 'नाम' फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक मंगेश भारसाकळे, सत्याग्रह शेतकरी संघटनेने प्रतिसाद दिला. उपक्रमासाठी सभागृह, मास्क, सॅनिटायर, व्हाईट बोर्ड, डस्टर, बोर्ड मार्कर, शाई, बॅटरी चलीत माईक आणि स्पीकर, पिण्याचे पाणी, पुस्तके, वह्यांची सोय केली. या उपक्रमाची दखल मुख्याध्यापक बोऱ्हाडे, शिक्षक तायडे यांनीही घेतली असून तरूणांचे कौतूक करण्यात येत आहे.

(संपादन - विवेक मेतकर, अकोला)