शाळांना हवे सॅनीटायझर, स्कॅनर, ऑक्सिमीटर आणि मास्क

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

शासनाने नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

चिखली (जि.बुलडाणा) : शासनाने नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

शाळेतील सर्व शिक्षकांची आरटीपीसी म्हणजेच कोविड चाचणी करणे बंधनकारक केलेले आहे. परंतु, चाचणी करण्याबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश नाही. तसेच विद्यार्थ्यांसाठी मास्क, स्कॅनर, ऑक्सिमिटर आणि सॅनिटायझरचा पुरवठा शासनाने करावा अशी मागणी आमदार श्वेताताई महाले यांनी शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे  केली आहे.

राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची घोषणा केली आहे. सोबतच १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची आरटीपीसी म्हणजे कोरोना चाचणी करून तपासणी अहवाल सादर करणे बंधनकारक केलेले आहे. चाचणी केल्यानंतरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहता येणार आहे.

मात्र चाचण्या कुठे करायच्या? याबाबत व खर्चाबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश शासनाने दिलेले नसल्याने शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संभ्रम निर्माण झालेला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाही. 

. येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी स्कॅनर होणे गरजेचे आहे. सोबतच शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजणे सुद्धा अत्यावश्यक आहे. परंतु स्कॅनर आणि ऑक्सिमीटरचा पुरवठा करण्याबाबत कोणतेही निर्देश नसल्याने शाळा व्यवस्थापनासमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच दररोज विद्यार्थ्यांना सॅनीटायझर लागत असल्याने तो खर्च कुठून करावा हा प्रश्न देखील शाळा व्यवस्थापनासमोर उभा राहिलेला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Schools need sanitizers, scanners, oximeters and masks