
जिल्हा परिषदेत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया चुकीच्या बदलीने राबविल्याचा आरोप प्रहार शिक्षक संघटनेने लावत या प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयात आक्षेप नोंदविला होता. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना विभागाच्या उपआयुक्तांनी याबाबत चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) दिले आहेत.
अकोला: जिल्हा परिषदेत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया चुकीच्या बदलीने राबविल्याचा आरोप प्रहार शिक्षक संघटनेने लावत या प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयात आक्षेप नोंदविला होता. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना विभागाच्या उपआयुक्तांनी याबाबत चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) दिले आहेत.
आंतरजिल्हा बदलीची प्रक्रियेमुळे आतापर्यंत १२ हजार शिक्षक गृहजिल्ह्यात परतले आहेत. बदली प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत चार टप्प्यांमध्ये प्रक्रिया राबविण्यात आली, परंतु चौथ्या टप्प्यात बदली प्रकिया करताना जिल्ह्यात मराठी माध्यमांच्या २१ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्यात आली.
त्यामध्ये बदलीवर आलेल्या १४ शिक्षकांचा समावेश आहे. प्रत्यक्षात ही प्रक्रियाच चुकीची राबविण्यात आल्याचा आरोप प्रहार शिक्षक संघटनेने केला आहे. या प्रक्रियेवर प्रहारने आक्षेप घेत ती पुन्हा राबविण्याची मागणी ठिय्या आंदोलन करून करण्यात आली होती. त्यामध्ये उर्दू माध्यमाच्या बदली झालेल्या शिक्षकांना रूजू करण्याची मागणी करण्यात आली.
मात्र त्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. बिंदुनामावली पूर्ण झाली असून, त्याचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही, यासह अनेक मुद्यांवर शिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न प्रहार संघटनेने केला. याव्यतिरीक्त शिक्षकांच्या अन्य प्रलंबित प्रश्नांवर प्रहार शिक्षक संघटनेने शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
यावेळी सर्व प्रलंबित प्रश्न निकाली न निघाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणी प्रहार संघटनेने विभागीय आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर आस्थापना विभागाच्या उपआयुक्तांनी यासंदर्भात सीईओंना पत्र देत या प्रकरणाचा स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)