अतिवृष्टीचा सामना करीत सीताफळ बागेतून साधले दोन लाखांचे उत्पन्न!

महादेव घुगे
Wednesday, 28 October 2020

तालुक्यातील पारंपरिक शेतीला फाटा देत अनेक शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या फळ बागा, मसाले पीक आणि फुलशेतीकडे मोर्चा वळविला; परंतु यंदा परतीच्या पावसाने अनेक शेकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. याही परिस्थितीत मोरगव्हाण येथिल युवा शेतकरी सोपान सीताराम कोकाटे यांनी एक एकर सीताफळ बागेतील फळांची किरकोळ विक्री करून सुमारे दोन लाखांचे उत्पन्न मिळवले.

रिसोड (जि.वाशीम) ः  तालुक्यातील पारंपरिक शेतीला फाटा देत अनेक शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या फळ बागा, मसाले पीक आणि फुलशेतीकडे मोर्चा वळविला; परंतु यंदा परतीच्या पावसाने अनेक शेकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. याही परिस्थितीत मोरगव्हाण येथिल युवा शेतकरी सोपान सीताराम कोकाटे यांनी एक एकर सीताफळ बागेतील फळांची किरकोळ विक्री करून सुमारे दोन लाखांचे उत्पन्न मिळवले.

तालुक्यातील मोरगव्हाण येथिल सीताराम कोकाटे यांची पारंपरिक शेतीला पसंती; परंतु पेरणीतील बोगस बियाण्यापासून ते बाजारपेठेतील शेती मालाच्या विक्रीपर्यंत प्रत्येक जागी शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या कारणाने लचके तोडण्याचे अनुभव पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पावलोपावली येतात.

त्यामुळे सोपान कोकाटे यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेत पुढील शिक्षणापेक्षा आधुनिक शेतीला प्राधान्य दिले. शेतातील पारंपरिक पिकांना प्रथम काही प्रमाणात बगल देत हळद, संत्रा, पिकांची लावगड केली.

परंतु शासनाच्या पोक्ररा सारख्या विविध योजनेची शेतकऱ्यांनी योग्य अंमलबजावणी केली तर शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता येण्यास वेळ लागणार नाही याचा विचार सोपानच्या डोक्यात सुरू झाला. सीताफळ लागवडीच्या अनेक यशोगाथांचा अभ्यास करून योग्य जातीची सीताफळ रोपे मिळण्याचे ठिकाण शोधले आणि अहमदनगर जिल्ह्यातील बाळानगर, सुपर गोल्डन जातीचे एक एकर शेतीमध्ये ३५० रोपांची लागवड केली. ही लागवड पाच वर्षांपूर्वी केली आहे.

मागील दोन वर्षांपासून सीताफळांचे चढते उत्पन्न मिळत आहे. सरासरी बागवांना सीताफळांची बाग ठोक विक्री केल्या जात होती. परंतु यावर्षांमध्ये कोरोना विषाणूतील लाॅकडाउनमध्ये कुटुंबातील सर्वच सदस्यांनी शेतातील सीताफळ बागेमध्ये जीव ओतला. परतीच्या पावसावर सुध्दा मात करीत योग्य आणि दर्जेदार सीताफळांचे उत्पन्न घेतले.

लाॅकडाउनमुळे व्यापारी बाग खरेदीकडे फिरकत नसल्याने सीताफळांची सरळ बाजारपेठेत स्वतः किरकोळ विक्री केली. एक एकर सीताफळ बागेमधून २० क्विंटल पेक्षा जास्त उत्पन्न निघाले. विशेष म्हणजे, शेकऱ्यांचा माल म्हणून ग्राहकांनी विशेष पसंती देत शंभर रुपयांच्या आसपास दर मिळाला. त्यामुळे आम्हाला उत्पन्न आणि ग्राहकांना दर्जेदार सीताफळे विक्री झाल्याने समाधान होत आहे.

सीताफळ बागेमध्ये पांढऱ्या चंदनाचे अंतर्गत पीक
युवा शेतकरी सोपान कोकाटे सीताफळ बागेची यशस्वी वाटचाल होत आसताना थेट पांढरे चंदनाची शेती करण्याकडे वळले आहेत. शंभर रुपये प्रति रोप या दराने ४१० रोपे खरेदी केली असून, या निर्णय बाजारपेठेचा अभ्यास करूनच घेतला असल्याचे कोकाटे सांगतात. पांढऱ्या चंदनामधून पान, बीज, गाभा आशा प्रकारे विविध प्रकारचे उत्पन्न विक्रीस मिळते. या पांढऱ्या चंदणाची शेती ही विशिष्ट कंपनीशी करारनामा करून करावी लागते. परंतु आपल्या उत्पन्नाचे दर एखाद्या कंपनीने ठरवावे हे पटत नसल्याने कुठल्याच कंपनीशी करारनामा केला नसताना एक एकर पांढऱ्या चंदनाच्या शेतीकडे वाटचालीचे धाडस केले आहे. कोकाटे यांच्या शेतीचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेण्यासारखा आहे.

शेतकरी मित्रांनी आधुनिक शेती करताना विविध ठिकाणच्या बाजारपेठेचा अभ्यास करून विविध शेती पिकांची लागवड करावी तरच शेतकरी यशस्वी शेती करू शकतो.
- सोपान सिताराम कोकाटे, युवा शेतकरी

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Two lakhs earned from custard apple orchard in the face of heavy rains!