व्यापारी वृत्तीनेच घेतला ‘टेंम्पल गार्डन’चा बळी

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 16 December 2020

अकोला नाका ते जिल्हा क्रीडा संकूल या भव्य परिसरात पसरलेल्या इंग्रजकालीन टेंम्पल गार्डनचे अस्तित्वच हरविले आहे. तत्कालीन राजकीय पुढाऱ्यांनी या उद्यानात व्यापारी गाळे निर्माण करून उर्वरित जागेत उत्कृष्ट उद्यान बनविण्याचे आश्वासन हवेत विरले असून, निर्माणाधीन उद्यानाची पार रया गेली आहे.

वाशीम : अकोला नाका ते जिल्हा क्रीडा संकूल या भव्य परिसरात पसरलेल्या इंग्रजकालीन टेंम्पल गार्डनचे अस्तित्वच हरविले आहे. तत्कालीन राजकीय पुढाऱ्यांनी या उद्यानात व्यापारी गाळे निर्माण करून उर्वरित जागेत उत्कृष्ट उद्यान बनविण्याचे आश्वासन हवेत विरले असून, निर्माणाधीन उद्यानाची पार रया गेली आहे. या उद्यानात रात्री आंबट शौकीनांचा मेळा भरत असून हे उद्यान नाकर्तेपणाचे अजून एक स्मारक ठरले आहे.

वाशिम शहराच्या उत्तरेला इंग्रजकालीन टेंम्पल गार्डन अस्तित्वात होते. मात्र, तत्कालीन नगरपरिषद प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांनी या उद्यानाच्या जागेवर व्यापारी संकूल उभे करण्याचा घाट घातला. यासाठी आरक्षण बदलले गेले. शहरातील सुज्ञ नागरिकांनी या बाबीला विरोध केल्यानंतर व्यापारी संकुलानंतर उर्वरीत जागेत भव्य उद्यान तयार करण्याचे स्वप्न दाखविले गेले. 

मात्र, आता पाच वर्षाचा कालावधी उलटून गेल्यावरही हे उद्यान अजूनही जंगली वनस्पतींनी व्यापले आहे. या उद्यानाचा कायापालट करण्यासाठी तीन वेगवेगळी कंत्राटे दिली कोट्यावधींचा निधी कंत्राटदाराच्या घशात घातला गेला मात्र, उद्यानात अजून कोणतीही सुविधा पूर्ण झाली नाही. उद्यानात पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविले गेले मात्र, ते उखडले गेले आहेत. मिनीट्रेनचा ट्रॅक अर्धवट पडला आहे. मुलांना खेळण्यासाठी अर्धवट लावलेले साहीत्य मातीखाली गडूप झाले आहे. कंत्राटदाराने हे काम पूर्ण का केले नाही? याबाब आश्चर्य व्यक्त केले जात असून, येथेही राजकीय छत्रछाया नांदत असल्याची चर्चा आहे.

उद्यान लहान व्यापार मोठा
पालिकेने टेंम्पल गार्डनच्या जागेत बांधलेल्या व्यापारी संकुलात व्यापार चांगलाच फुलला आहे. मात्र, बाजूचे उर्वरीत उद्यान भकास झाले आहे. मुळात येथे निसर्गावर व्यापारी वृत्तीने अतिक्रमण केले आहे. शहरवासिंना मोठ-मोठे स्वप्न दाखविण्यात पटाईत असणारे तत्कालीन कारभारी आता तोंडावर बोट ठेवून आहेत.

जिल्ह्याचे ठिकाण झाले ओसाड
वाशीम हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. एका लाखांवर लोकसंखेच्या या शहरात एकही उद्यान नाही. टिळक उद्यानाला अनास्थेची वाळवी लागल्याने या उद्यानातील लोकमान्याचा पुतळा हताष झाला आहे. तर टेंम्पल गार्डनचा व्यापारी वृतीने घास घेतल्याने विना उद्यानाचे शहर हा डाग शहराच्या माथी लावण्याचे पाप तथाकथीत विकासमर्षींनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: The victim of Temple Garden took a business attitude