
सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी ता. २६ ऑक्टोबरपासून विविध टप्प्यात राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.
अकोला ः सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी ता. २६ ऑक्टोबरपासून विविध टप्प्यात राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.
अजूनपर्यंत शासनाकडून त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नसल्याने आज जवळपास १० ते १२ हजार कर्मचारी सामूहिक रजेवर जाणार असून धरणे आंदोलन करणार आहेत तर, उद्यापासून मागणी पूर्ण होईपर्यंत कामबंद आंदोलन केले जाणार असल्याचे कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघामार्फत सांगण्यात आले आहे.
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सुधारीत आश्वासीत प्रगती योजनेसह सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान चारही कृषी विद्यापीठातील प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने ४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे कृषिमंत्री दादाजी भूसे, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. भेटीदरम्यान नमुद विषयांवर चर्चा होऊन शासनाचे यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली.
परंतु, नेमका किती कालावधी लागेल अथवा शासन निर्णय कधी निर्गमीत होईल याबाबत स्पष्टता नसल्याने ६ नोव्हेंबर रोजी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाने सामुहिक रजा आंदोलन निर्धारित केले आहे. रजेवर असले तरी, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सर्व कर्मचारी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता शहीद स्तंभाजवळ सामाजिक अंतर राखून एकत्र येणार असून, ७ नोव्हेंबरपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलनाचे निवेदन कुलसचिवांना सादर करणार आहेत.
आंदोलनांतर्गत सर्व वाहनचालक आंदोलनात सहभागी असल्याने सर्व शासकीय वाहने जागेवरच उभी राहणार आहेत. आज सर्व कर्मचारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वारावर सकाळी ९.३० वाजतापासून धरणे आंदोलन देणार आहेत. ता. ७ नोव्हेंबरपासून सातवा वेतन आयोग लागू होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन राहणार असून, भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे समन्वय संघामार्फत सांगण्यात आले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)