जागतिक टपाल दिन: 45 हजार पालकांनी मुलींचे भविष्य केले सुरक्षित!

सुगत खाडे  
Friday, 9 October 2020

महिलांच्या शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजांसाठी सरकारद्वारे अनेक योजना चालवण्यात येतात. त्यापैकी एक सुकन्या समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश्य मुलींचे शिक्षण आणि लग्न सहजरित्या पार पाडणे आहे. सदर योजनेत पालक अल्प गुंतवणूक करुन मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत मोठी रक्कम मिळवू शकतात.

अकोला ः महिलांच्या शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजांसाठी सरकारद्वारे अनेक योजना चालवण्यात येतात. त्यापैकी एक सुकन्या समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश्य मुलींचे शिक्षण आणि लग्न सहजरित्या पार पाडणे आहे. सदर योजनेत पालक अल्प गुंतवणूक करुन मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत मोठी रक्कम मिळवू शकतात.

योजनेच्या सदर वैशिष्ट्‍यामुळे अकोला व वाशीम जिल्ह्यातील ४५ हजार ५७८ पालकांनी त्यांच्या मुलींचे भविष्य सुरक्षित केले आहे. संबंधित पालकांनी पोष्टाच्या सुकन्या समृद्धी योजनेत खाते उखडून ६९ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे.

आई-वडिलांना आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सन् २०१५ मध्ये सुकन्या समृद्धि योजना (एसएसवाय) सुरू केली गेली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत ही योजना सुरू केली.

ही एक छोटी ठेव योजना आहे जी मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवते. एसएसवाय या केंद्र सरकारच्या योजनेत लाभार्थी तीन पट जास्त पैसा मिळवू शकतो. या योजनेतील गुंतवणुकीवर टॅक्समध्ये सूट देखील मिळते. योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती तिच्या मुलीच्या नावावर खाते उघडू शकते. एक व्यक्ती केवळ दोन मुलींच्या नावावर हे खाते उघडू शकते.

यापेक्षा जास्त खाती उघडण्यासाठी प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. या योजनेअंतर्गत दहा वर्षांपर्यंत मुलीच्या नावाने खाते उघडता येते. मुलींचा भविष्यकाळ अधिक दृढ करणाऱ्या सदर योजनेचे खाते बॅंक किंवा पोष्टात उघडल्या जावू शकते. अकोला व वाशीम जिल्ह्यातील ४५ हजार ५७८ पालकांनी सदर योजनेचा लाभ उचलत त्यांच्या मुलींचे भविष्य सुरक्षित केले आहे.

अशी आहे योजना
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या नावावर एका वर्षात १ हजार ते दीड लाख रुपये जमा करता येते.
- सदर रक्कम खाते उघडायच्या १४ वर्षांपर्यंत जमा करावी लागेल. रक्कमेवरील गुंतवणूक मुलगी २१ वर्षांची झाल्यावर मॅच्योर होते.
- नियमांप्रमाणे मुलगी १८ वर्षांची झाल्यावर अर्धा पैसा काढता येतो. २१ वर्षांनंतर खाते बंद होऊन पैसे पालकांच्या स्वाधीन केले जातात.

भारतीय डाक विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सुकन्या समृद्धी योजना (खाते) हे त्या पैकीच एक आहे. अकोला आणि वाशिम जिल्ह्यात डाक विभागामार्फत आतापर्यंत ४५ हजार ५७८ मुलींचे खाते उघडण्यात आले आहेत. त्याखात्यांमध्ये ६९ कोटी २५ लाख रक्कम जमा झालेली आहे. योजनेला दोन्ही जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आहे.
- शिवशंकर लिंगायत, मुख्य अधीक्षक, डाक मंडळ, अकोला

संपादन - विवेक मेतकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: World Postal Day: 45,000 parents secure future of girls!