
जिल्हा परिषदेत सोमवारी (ता. १९) मराठी माध्यमाच्या शिक्षकांना समूपदेशनाने पद स्थापना देण्याबाबतची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आली.
अकोला ः जिल्हा परिषदेत सोमवारी (ता. १९) मराठी माध्यमाच्या शिक्षकांना समूपदेशनाने पद स्थापना देण्याबाबतची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आली. त्यामुळे सदर प्रक्रियेवर प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे. आक्षेप नोंदवण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार व शिक्षणाधिकारी प्राथमिक वैशाली ठग यांच्या सोबत चर्चा केली. शिक्षकांच्या विविध प्रकारच्या प्रलंबित मागण्यांसदर्भात प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंतर जिल्हा बदली टप्पा ४ मधील उर्दू माध्यमाच्या बदली झालेल्या सर्व शिक्षकांना हजर करुन घेण्याबाबत चर्चा केली. त्यासह उर्दू माध्यमातील अनुसूचित जमाती मधील जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या शिक्षकांना अधिसंख्य पदावर सामावून घेण्याबाबत शासन निर्णय आणि शासन पत्रक दाखवून या प्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली. वरील सर्व प्रलंबित प्रकरणे आठ दिवसात निकाली न निघाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा प्रमुख मंगेश टिकार, हेमंतकुमार बोरोकार, अमोल वर्हेकर, श्रीराम झटाले, शिरीष जाधव आणि इतर उर्दू बांधव शिक्षक उपस्थित होते.
शिक्षकाधिकाऱ्यांसोबत चर्चा (संपादन - विवेक मेतकर) |
|||