जिल्हा परिषद बांधणार सुसज्ज ऑडिटोरियम

सुगत खाडे  
Friday, 9 October 2020

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण, स्थायी सभांसह इतर महत्वाच्या बैठका घेण्यासाठी सुसज्ज ऑडिटोरियमचे (सभागृह) बांधकाम करण्याच्या प्रस्तावास गुरुवारी (ता. ८) बांधकाम समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. सभेत इतर विषयांवर सुद्धा चर्चा करुन जिल्हा परिषदेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले.

अकोला  ः जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण, स्थायी सभांसह इतर महत्वाच्या बैठका घेण्यासाठी सुसज्ज ऑडिटोरियमचे (सभागृह) बांधकाम करण्याच्या प्रस्तावास गुरुवारी (ता. ८) बांधकाम समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. सभेत इतर विषयांवर सुद्धा चर्चा करुन जिल्हा परिषदेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची सभा गुरूवारी (ता. ८) ऑनलाईन पद्धतीने पार पडली. सभेत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीच्या सभांसाठी वर्तमान जिल्हा परिषदेचे राजश्री छत्रपती शाहू महाराज सभागृहाची जागा कमी पडत असल्यावर चर्चा करण्यात आली.

सदर सभागृहात सुविधा नसल्याने जिल्हा परिषद सदस्य व अधिकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभांसह विविध प्रकारच्या बैठकांसाठी जिल्हा परिषदेत सुसज्ज ऑडिटोरियमचे (सभागृह) बांधकाम करण्याच्या प्रस्तावास गुरुवारी (ता. ८) बांधकाम समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.

सभेची अध्यक्षता बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरूजी यांनी केली. सभेत जिल्हा परिषदेच्या इमारतींचे संरक्षण व संवर्धन करण्यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ऑनलाईन पार पडलेल्या सभेत जि.प. सदस्य सुनील धाबेकर, पवन बुटे, विनोद देशमुख, सुलभा दुतोंडे, सुनीता गोरे, प्रमोदिनी कोल्हे, मीरा पाचपोर, लता पवार, सुनीता मोरे, सचिव कार्यकारी अभियंता (बांधकाम) व इतर उपस्थित होते.

सभेत घेतलेले इतर निर्णय
- जि.प.च्या मालमत्तेवरील झालेले अतिक्रमण काढण्याबाबत सभेत निर्देश देण्यात आले.
- जि.प.च्या आवारात ५० लाख रुपये खर्च करुन पिण्याचे पाण्याची टाकी बांधकाम करणेबाबत निर्णय घेण्यात आला.
- अंगणवाडी दुरुस्तीच्या मुद्यावर सभापती, महिला व बालकलयाण यांचेकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या.

- आदिवासी भागामध्ये रस्ते व सभागृह बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला असता संबंधित प्रस्ताव आदिवासी विभागाकडे सादर करण्याचे निर्देश बांधकाम सभापती यांनी दिले.
- जिल्हा परिषद/पंचायत समिती मार्फत विविध योजनांमधून खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्या जातात. सदर कामाचे भूमिपूजनाचे कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य निमंत्रित केल्याशिवाय कोणतेही विकास कामे सुरु करण्यात येवू नये असे, निर्देश सभापती यांनी दिले.

संपादन - विवेक मेतकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Zilla Parishad to build well-equipped auditorium