Akola : सिंदखेडराजात हवे महिला विद्यापीठ; राज्यपालांना प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhagat singh koshyari

Akola : सिंदखेडराजात हवे महिला विद्यापीठ; राज्यपालांना प्रस्ताव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या नावे बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजात महिला विद्यापीठ उभारण्यात यावे, अशा मागणीचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामेश्वर पवळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला. या विषयाच्या अनुषंगाने तज्ज्ञांच्या भेटी घेऊन माहिती संकलनासही त्यांनी सुरुवात केली.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ देशातीलच नव्हे तर दक्षिण-पूर्व आशियातील पहिले महिला विद्यापीठ आहे. महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे यांनी १९१६ मध्ये महिला शिक्षणासाठी याची मुंबईत स्थापना केली. या विद्यापीठातून १९२१ मध्ये चार महिला पदवीधर झाल्या. शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या या विद्यापीठाचे चार कॅम्पस, ३९ विभाग, १३ इन्स्टिट्यूट आणि १६६ महाविद्यालये आहेत.

राज्याचा विचार करता हे एकमेव महिला विद्यापीठ आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, शिक्षण असे उद्दिष्ट साध्य केले जात आहे. या प्रवाहाचा झरा विदर्भात अपेक्षित प्रमाणात पोहचू शकला नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी या भूमीतही महिला विद्यापीठाची गरज आहे. मुंबई राजधानी तर नागपूर या राज्याची उपराजधानी असल्याने विदर्भातही असे विद्यापीठ आवश्यक असल्याचा सूर उमटत आहे.

विद्यापीठासाठी पोषक वातावरण आणि सुविधा सिंदखेडराजात उपलब्ध असल्याचेही पवळ यांनी प्रस्तावातून लक्षात आणून दिले. महिलांसाठी आदर्शवत असे हे स्थळ असल्याने महिला विद्यापीठासाठी याचा विचार व्हावा, असेही पवळ यांनी निवेदनात म्हटले आहे. यासाठी आवश्यक निधी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी उपलब्ध करून द्यावा, याकडेही त्यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

विकास आराखड्यातच व्हावा समावेश

सिंदखेडराजा विकास आराखडा जाहीर करून विकासकामे केली जात आहेत. एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणूनही याचा विचार होईल या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. याच विकास आराखड्यात विद्यापीठाचा समावेश करून स्वतंत्र तरतूद करण्यात आल्यास महिला विद्यापीठ उभारणीची वाट सुकर होईल, असा विश्वासही पवळ यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: कंगणाविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल; शेतकऱ्यांना 'खलिस्तानी' ठरवणं भोवलं

सर्वपक्षीयांनी यावे एकत्र

समाजातील सर्वच पक्षातील नेत्यांनी या महिला विद्यापीठासाठी एकत्र येण्याचे आवाहन रामेश्वर पवळ यांनी केले आहे. माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी आपण साऱ्यांनी एकत्र आल्यास समाजात एक नवा आदर्श स्थापन करणे शक्य होईल. आजवर एकमेकांवर आरोप करणारे राजकारणी यानिमित्ताने एकत्र आल्याचे दिसून आल्यास एक सकारात्मक चित्र तयार होणार असल्याचेही पवळ यांनी म्हटले आहे.

विदर्भाचे विद्यापीठ वैभव

- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

loading image
go to top