Akola: दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधान परिषद निवडणुक

अकोला : दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध

अकोला : विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांचे अर्ज वैध ठरले आहेत. बुधवारी अर्जाची छाननी करण्यात आली. दोन्ही उमेदवारांनी परस्परांविरुद्ध दाखल केलेले आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी सुनावणीनंतर दोन्ही आक्षेप फेटाळले.

महाराष्ट्र विधान परिषद अकोला, वाशीम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२१ साठी शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया व भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी प्रत्येकी चार-चार असे एकूण आठ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्जांची जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये बुधवार, ता. २४ नोव्हेंबर रोजी छाननी करण्यात आली.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

या छाननीमध्ये गोपीकिशन बाजोरिया व वसंत खंडेलवाल या दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यामुळे सध्या दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ता. २६ नोव्हेंबर आहे. या निवडणुकीमध्ये अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यातील ८२२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील २८७, वाशीम जिल्ह्यातील १६८ तर बुलढाणा जिल्ह्यातील ३६७ मतदारांचा समावेश आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार तिन्ही जिल्ह्यामध्ये ता.१० डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान करण्यात येईल तर ता. १४ डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येईल.

दोन्ही उमदेवारांनी घेतले होते आक्षेप

उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जात द्यावयाची माहिती अपूर्ण किंवा चुकीची भरल्याबाबतचा आक्षेप दोन्ही उमेदवारांकडून नोंदविण्यात आला होता. या अर्जाची छाननी करण्यापूर्वी दोन्ही उमेदवारांच्या आक्षेपावर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी दोन्ही उमेदवारांचे वकिल उपस्थित होते. दोन्ही उमेदवारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आक्षेप फेटाळण्यात आले. ॲपिट्यूट देताना उमेदवारांनी कोणती माहिती द्यावी हा त्यांचा अधिकार असतो. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी परस्पर घेतलेले आक्षेप फेटाळण्यात आले.

loading image
go to top