esakal | पंचनामे अडकले निकषात, पालकमंत्री साताऱ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Akola washim News: Panchnama stuck in criteria, Guardian Minister in Satara

जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने नुकसानीची उच्चतम पातळी गाठली आहे. सोयाबीन कपाशीचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी यामधे निकष मात्र २०१५ च्या शासनादेशानुसार ठरविले आहेत.

पंचनामे अडकले निकषात, पालकमंत्री साताऱ्यात

sakal_logo
By
राम चौधरी

वाशीम  : जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने सोयाबीन, कपाशीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करताना ता.१३ मे २०१५ चा शासनादेश अडथळा ठरत असून, जिल्ह्याचे पालकमंत्री साताऱ्यात बसून जिल्ह्याचे पालकत्व निभावत आहेत. त्यामुळे ही कोंडी फुटणार कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळेत पंचनामे झाले नाहीत तर शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भिती आहे.


जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने नुकसानीची उच्चतम पातळी गाठली आहे. सोयाबीन कपाशीचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी यामधे निकष मात्र २०१५ च्या शासनादेशानुसार ठरविले आहेत.

या निकषानुसार ६५ मिलिमीटर पाऊस झाला तरच पूर व अतिवृष्टीच्या निकषात मदतीचे प्रस्ताव पात्र ठरू शकतात. मात्र जिल्ह्यात ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याने प्रशासनाने पंचनामे कसे करावेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या कठीण परिस्थितीत पालकमंत्री मार्ग काढू शकतात; मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई ‘झेंडा टू झेंडा’च पालकत्व निभावत आहेत. केवळ ऑनलाईन बैठका घेवून परिस्थितीचे आकलन करणे वाऱ्यावरची वरात ठरत असून, पालकमंत्री सातारचे की वाशीमचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.


नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा -आमदार पाटणी
वाशीम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देवून शेतकऱ्यांना वाचवा, अशी आग्रही मागणी आपण सरकारकडे केल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली. स्थानिक जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आ. पाटणी बोलत होते.

यावेळी संघटन महामंत्री सुनील राजे, जिल्हा महामंत्री नागेश घोपे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नितिन काळे आदींची उपस्थिती होती. आ. पाटणी यावेळी पुढे बोलताना म्हटले की, जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे मूग व उडीदाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काढणीला आलेल्या सोयाबिनच्या पिकाला कोंब फुटले होते. सखल भागातील कपाशी व तुरीच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी, शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला होता. तेव्हाच राज्यात सत्तारूढ महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल, अशी सर्वांना अपेक्षा होती.

मात्र, कोरोनाचा बहाना करून घरातच ठाण मांडूण बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या वेदना जाणल्या नाहीत. शेतकऱ्यांनी या निद्रिस्त सरकारला उठविण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांचा आवाज झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारी कानापर्यंत पोहोचू शकला नाही. सदर अस्मानी संकटातून सावरण्याचा प्रयत्न करीत असलेल्या बळीराजावर पून्हा ता.११ ऑक्टोबरला नव्या संकटाने घाला घातला.

ता.११ ऑक्टोबरपासून सलग तीन दिवस परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपले. यामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनची पुरती नासाडी झाली. बहुतांश शेतकऱ्यांनी सोंगलेल्या सोयाबीनच्या शेतातच सुड्या लावल्या होत्या. परंतु पावसाने या सुड्यांचे सोबतच सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन नुकसानीचे सर्वेक्षण करा व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.

पालकमंत्र्यांकडे सर्वेक्षणाची मागणी
आपण स्वत: जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षणाबाबत बोललो. एवढेच नव्हेतर पालकमंत्री शंभुराज देसाई यांनाही व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये प्रशासनाला नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश देण्याची मागणी केली. त्यानंतर आज (ता.१९) पून्हा एकदा पालकमंत्री महोदयांशी दुरध्वनीद्वारे चर्चा करून त्यांच्याकडे सर्व्हेक्षणाची आग्रही मागणी केली. मात्र तरीही शासन जागले नाही. भारतीय जनता पार्टीने सरकारच्या या निष्क्रियपणाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे ठरविले आहे. शेतकजयांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ सर्व्हेक्षण करून त्यांना हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याची आमची मागणी आहे. सरकारने या मागणीची दखल घेवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देवून त्यांना वाचवावे, असे आमदार पाटणी म्हणाले.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image